मुंबई : आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये 14 ऑगस्ट या तारखेला खूप महत्त्व आहे. एकिकडे सर डॉन ब्रॅडमन युगाचा शेवट आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर युगाची सुरुवात, याचा योगायोग हा 14 ऑगस्ट या तारखेशीच जोडला गेलेला आहे.
आजच्याच दिवशी, परंतु 1948 साली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना हा सर डॉन ब्रॅडमन यांचा अखेरचा सामना होता. या सामन्यात 4 धावा करून त्यांना फलंदाजीची सरासरी ही 100 राखता आली असती, परंतु त्यांना एरिक हॉलिसने बाद केले. त्यामुळे या कसोटीपूर्वी 101.39 अशी सरासरी असलेल्या ब्रॅडमन यांना 99.94च्या सरासरीसह कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली. ती कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकली.
दुसरीकडे 42 वर्षांनंतर ओल्ड ट्रॅफर्ड येथे आजच्याच दिवशी तेंडुलकरने कसोटी कारकिर्दीतले पहिले शतक झळकावले होते. इंग्लंडने ठेवलेल्या 408 धावांचा पाठलाग करताना भारताचे नवज्योत सिंग सिंद्धू ( 0) आणि रवी शास्त्री ( 12) झटपट माघारी परतले. संजय मांजरेकर ( 50) आणि दिलीप वेंगसरकर ( 32) यांनी संघर्ष केला, परंतु 109 धावांवर दोघेही माघारी परतले. त्यानंतर कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनही ( 11) लगेच माघारी परतला.
त्यानंतर 17 वर्षीय तेंडुलकरनं भारताचा पराभव टाळला. त्याने कपिल देवसह सहाव्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. एडिल हेमिंग्सन ही जोडी फोडली. पण, तेंडुलकरने अखेरपर्यंत खिंड लढवून संघाची लाज वाचवली. तेंडुलकरने 225 मिनिटे खेळपट्टीवर टिकून खेळ करताना 189 चेंडूंत 17 चौकारांसह नाबाद 119 धावा केल्या.
कसोटी क्रिकेटमधील तेंडुलकरचे हे पहिलेच शतक होते. त्यानंतर तेंडुलकरने पुढील 23 वर्षांत आणखी 99 आंतरराष्ट्रीय शतकं झळकावली.