- सुनील गावसकर लिहितात...
वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका अगदीच एकतर्फी झाली. दुसऱ्या सामन्यात तिस-या दिवसाच्या सकाळच्या सत्राचा अपवाद वगळता भारतीयांवर कुठलेही दडपण जाणवले नाही. एकेकाळच्या बलाढ्य विंडीज संघाविरुद्ध भारताला सांघिक कामगिरी झालेली नसताना विजय नोंदविणे कठीण गेले नाही. १९६० च्या दशकात अनेक संघ वेस्ट इंडिज किंवा अन्य संघांविरुद्ध तीन दिवसांत असेच पराभूत व्हायचे. आता वन-डे मालिका खेळली जाणार असून विंडीजला चांगली कामगिरी करण्याची संधी असेल.
पण येथेही त्यांचे दमदार खेळाडू एक तर संघाबाहेर आहेत किंवा जगातील कुठल्या तरी फ्रॅन्चायसी लीगमध्ये खेळण्यात व्यस्त
आहेत. याच मुद्यामुळे विंडीजच्या खेळाडूंकडून विश्व क्रिकेटमध्ये दिसणारे कौशल्य आणि थरार रसातळाला जाताना दिसत आहे.
टीम इंडियाचे लक्ष्य अर्थात विजयी लय कायम राखणे हेच असेल. जुनी म्हण आहे, ‘प्रक्टिस मेक्स मॅन परफेक्ट’! ही म्हण वैयक्तिकदृष्ट्या आणि सांघिकरीत्या भारतीय संघाला लागू होते.
विजय नोंदविणे ही संघाची सवय बनायला हवी. फलंदाज झकास सुरुवात करून देत असून मधल्या षटकांत धावसरासरी वाढविणे,
तसेच अखेरच्या दहा षटकांत धावसंख्येला योग्य आकार देण्याचे काम भारतीय संघाकडून अपेक्षित आहे. गोलंदाजांनीही प्रतिस्पर्धी संघाला सुरुवातीला धक्के देत मधल्या षटकांतील खेळात धावा रोखण्याचे काम करायला हवे, या मालिकेच्यानिमित्ताने संघातील दुसºया फळीतील गोलंदाजांना क्षमता दाखविण्याची आणि प्रस्थापित गोलंदाजांवर दडपण वाढविण्याची मोठी संधी असणार आहे.
आशिया चषकादरम्यान विश्रांती घेऊन परतल्यानंतर कर्णधार कोहलीमध्ये धावांची भूक निर्माण झाली असावी. शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्यापाठोपाठ मोठी फटकेबाजी करण्याची कोहलीकडे संधी असेल. वेस्ट इंडिजने स्वत:ची देहबोली बदलून आव्हानात्मक खेळ करायलाच हवा. कसोटी मालिकेदरम्यान पाहुण्या खेळाडूंची मानसिकता पराभूतांची जाणवली. वन डेतही हेच चित्र कायम राहिल्यास पुन्हा एकतर्फी विजय पाहायला मिळतील. असे घडू नये... माझा अंदाज खोटा ठरावा... विलक्षण चुरस पाहायला मिळावी. (पीएमजी)