एकदिवसीय क्रिकेट कमाईचे साधन - मायकेल होल्डिंग

मायकेल होल्डिंग : कितीही शंका व्यक्त केली तरी आयसीसी हा प्रकार कायम राखेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 02:28 IST2020-06-09T02:28:23+5:302020-06-09T02:28:48+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
One-day cricket earnings tool | एकदिवसीय क्रिकेट कमाईचे साधन - मायकेल होल्डिंग

एकदिवसीय क्रिकेट कमाईचे साधन - मायकेल होल्डिंग

नवी दिल्ली : ‘आयसीसी कधीही ५० षटकांचे सामने खेळविणे बंद करणार नाही. याच प्रकारात टीव्ही अधिकार आणि इतर माध्यमातून सर्वाधिक कमाई होत असल्याने एकदिवसीय क्रिकेटविषयी कितीही शंका व्यक्त होत असली तरी हा प्रकार सुरू राहील’, असे मत वेस्ट इंडिजचे महान गोलंदाज मायकेल होल्डिंग यांनी सोमवारी व्यक्त केले. याआधी रिकी पाँटिंग आणि राहुल द्रविड यांनी टी२० ची वाढती लोकप्रियता तसेच कसोटी क्रिकेटचे आव्हान कायम राहावे यासाठी एकदिवसीय क्रिकेटचे अस्तित्व धोक्यात असल्याची चिंता व्यक्त केली होती. होल्डिंग यांच्या मते एकदिवसीय क्रिकेटला कुणीही हात लावू शकणार नाहीत.

निखिल नाज यांच्यासोबत इन्स्टाग्रामवर चर्चा करताना होल्डिंग यांनी एकदिवसीय क्रिकेटच्या भविष्याविषयी चर्चा केली. एकदिवसीय सामन्यात टीव्ही अधिकारातून सर्वाधिक कमाई होत असल्याचे निदर्शनास आणून देत ते पुढे म्हणाले, ‘एकदिवसीय क्रिकेट बंद केल्यास कमाई कमी होईल. मी टी-२० प्रकाराचा पाठीराखा नाही. क्रिकेटला आता लहान लहान प्रकारांपासून वाचविण्याची गरज आहे.’ (वृत्तसंस्था)

नियम जखमेवर मलमपट्टी करण्यासारखा
‘जोपर्यंत वर्णद्वेषाविरुद्ध समाज एकजूट होत नाही, तोपर्यंत खेळातील वर्णद्वेषविरुद्ध नियम हा जखमेवर मलमपट्टी करण्यासारखाच आहे,’ असे मत दिग्गज गोलंदाज मायकेल होल्डिंग यांनी व्यक्त केले. आफ्रिकन वंशाचा अमेरिकन नागरिक जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूनंतर वर्णद्वेषाविरुद्ध सुरू असलेल्या जागतिक आंदोलनावर प्रतिक्रिया देताना होल्डिंग म्हणाले, ‘केवळ कठोर नियम केल्याने खेळातील वर्णद्वेष रोखणे शक्य नाही. समाजातून वर्णद्वेष हद्दपार झाल्याशिवाय क्रिकेट, फुटबॉल किंवा इतर मैदानावरून तो हटणे शक्य नाही. स्टेडियममध्ये चाहतेच वर्णद्वेषी वक्तव्ये करतात. भेदभाव करणे स्वीकारार्ह नाही, हे समाजाला पटवून देण्याची गरज आहे. खेळाचे नियम असून शकतात. ते मानले जातात, मात्र वर्णद्वेषाविरुद्धचे नियम केवळ जखमेवर मलमपट्टी करण्यासारखे आहेत.’

चेंडूच्या चकाकीसाठी घाम प्रभावी ठरेल
होल्डिंग यांच्या मते, चेंडूला चकाकी आणण्यासाठी घाम हा लाळेचा पर्याय ठरू शकतो. चेंडू नरम राखायचा झाल्यास घामाचा वापर योग्य ठरेल. त्यासाठी लाळेची गरज नाही. घामामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होतो, असे मी ऐकलेले नाही.

तर ५-५ षटकांचा खेळ पसंत पडेल
च्ते म्हणाले, ‘चाहत्यांना टी-२० प्रकाराचा आनंद घ्यायला आवडतो. टी-१० सामन्यांचे आयोजन होऊ लागले आहे. त्यामुळे टी-२० प्रकारात चाहते रममाण होणार नाहीत. आता ५-५ षटकांचा खेळ सुरू करण्याची मागणी होऊ लागेल की काय, अशी मला भीती वाटते. क्रिकेटचे स्वरूप आणखी लहान करू नका. केवळ चाहत्यांचे हित साधण्यासाठी खेळाचे नुकसान करणे योग्य नाही. असे केल्यास काही वर्षानंतर तुमच्याकडे काहीच नावीन्य शिल्लक असणार नाही.’

Web Title: One-day cricket earnings tool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.