Join us  

OMG! सहा चेंडू, सहा षटकार; अफगाणी खेळाडूचा चमत्कार

अफगाणिस्तानच्या हजरतुल्लाह जजईने दमदार फटकेबाजी करताना एका विक्रमाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 9:33 AM

Open in App

शारजाह : अफगाणिस्तानच्या हजरतुल्लाह जजईने दमदार फटकेबाजी करताना एका विक्रमाची नोंद केली. अफगाणिस्तान प्रीमिअर लीगमध्ये काबुल जवानन संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने 55 चेंडूंत 124 धावांची स्फोटक फलंदाजी केली. त्याने बल्ख लेजंट्स संघाच्या गोलंदाजांची तुफान धुलाईने लय बिघडवून टाकली. पण त्याने एका षटकात सहा षटकार खेचण्याचा पराक्रम केला. त्याचबरोबर त्याने 12 चेंडूंत अर्धशतकही पूर्ण केले.  

बल्क लेजंट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत 20 षटकांत 6 बाद 244 धावा केल्या. त्यांच्याकडून ख्रिस गेलने 48 चेंडूंत 10 षटकार आणि दोन चौकार लगावत 80 धावांची खेळी केली. त्याला श्रीलंकेच्या दिलशान मुनावीराने 25 चेंडूंत 46 धावा ( 5 चौकार व 3 षटकार) करताना चांगली साथ दिली. रारविश रसूलनेही 25 चेंडूंत 50 धावा केल्या. कर्णधार मोहम्मद नबीनेही 37 धावा कुटल्या. 

या लक्ष्याचा पाठलाग करताना काबुल जवाननचे सलामीवीर ल्युक राँची आणि हजरतुल्लाह जजई यांनी वादळी खेळी केली. जजईने चौथ्या षटकांत षटकारांचा पाऊस पाडला. अब्दुल्ला मजारीच्या एका षटकात त्याने एका अतिरिक्त धावेसह 37 धावा काढल्या.  जजईने 12 चेंडूंत अर्धशतकही पूर्ण केलेय त्याने या कामगिरीसह ट्वेंटी-20 क्रिकेट प्रकारात जलद अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली. हा विक्रम भारताचा युवराज सिंग आणि ख्रिस गेल यांच्या नावावर आहे. युवराजने 2007 च्या ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ट ब्रॉडजच्या एका षटकात 6 षटकार खेचले होते. गेलने बिगबॅश लीगमध्ये 12 चेंडूंत अर्धशतक केले होते. युवराज सिंग आणि जजई यांच्या व्यतिरिक्त वेस्ट इंडिजचे गॅरी सोबर्स, भारताचे रवी शास्त्री, दक्षिण आफ्रिकेचा हर्शल गिब्स, इंग्लंडचा अॅलेक्स हेल्स, भारताचा रवींद्र जडेजा आणि पाकिस्तानचा मिसबाह उल हक यांनी एका षटकात 6 षटकार खेचले आहेत. मात्र, यापैकी युवराज ( ट्वेंटी-20) आणि हर्शल गिब्स ( वन डे) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केली आहे. 

टॅग्स :आयसीसीअफगाणिस्तान