Asia Cup 2025 Oman Squad : ओमानने आशिया कप २०२५ साठी १७ सदस्यीय संघ जाहीर केला. संघाचे नेतृत्व भारतीय वंशाचा 'पंजाबी मुंडा' खेळाडू जतिंदर सिंगकडे देण्यात आले आहे. संघातील अनेक खेळाडू पाकिस्तानी वंशाचे आहेत. त्यात मोहम्मद नदीम आणि आमिर कलीम यांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ६ संघांनी (पाकिस्तान, भारत, हाँगकाँग, ओमान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान) आशिया कपसाठी त्यांचे संघ जाहीर केले आहेत. आता फक्त २ संघ (श्रीलंका आणि यूएई) जाहीर व्हायचे बाकी आहेत. पण ओमानच्या संघाचे मुख्य आकर्षण म्हणजे, त्यांचा कर्णधार जो पंजाबी आहे.
ओमानचा कर्णधार जतिंदर सिंग कोण आहे?
ओमानचा कर्णधार जतिंदर सिंग हा ३६ वर्षांचा आहे. तो मूळचा पंजाबमधील लुधियाना येथील आहे. या क्रिकेटपटूने २०१५ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध टी२० मध्ये पदार्पण केले होते. तो उजव्या हाताने फलंदाजी करतो. आतापर्यंतची त्याची टी२० कारकीर्द खूपच चांगली राहिली आहे. त्याने ६४ सामन्यांमध्ये २४.५४च्या सरासरीने १,३९९ धावा केल्या आहेत. पंजाबचा मुंडा आता भारताविरूद्ध कसा खेळेल, याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे.
आशिया कपमध्ये ओमानचे सामने
आशिया कप २०२५ मध्ये, ओमान १२ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळेल. त्यानंतर, संघ १५ सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध दुसरा सामना खेळेल. तर १९ सप्टेंबर रोजी तिसऱ्या सामन्यात त्यांचा सामना भारतीय संघाशी होईल. हे दोन्ही सामने अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर होणार आहेत.
आशिया कपसाठी ओमानचा संघ
जतिंदर सिंग (कर्णधार), विनायक शुक्ला, मोहम्मद नदीम, हम्माद मिर्झा, आमिर कलीम, सुफियान महमूद, आशिष ओडेदरा, शकील अहमद, आर्यन बिश्त, समय श्रीवास्तव, करण सोनावले, हसनैन अली शाह, मुहम्मद इम्रान, सुफियान युसुफ, नदीम खान, झिकारिया इस्लाम, फैसल शाह