Join us

आक्षेपार्ह वक्तव्य : पांड्याबाबत विराट 'कोहलीने हात झटकले'

आक्षेपार्ह वक्तव्य : दोघांमुळे टीम इंडियावर कुठलाही परिणाम नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 04:11 IST

Open in App

सिडनी : एका टीव्ही शोमध्ये महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल चांगलेच अडचणीत आले आहेत. चौकशी होईपर्यंत त्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर, आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनेही हार्दिकने केलेल्या वक्तव्याचे समर्थन करता येणार नसल्याचे सांगून हात वर केले आहेत.

‘भारतीय संघाच्या दृष्टिकोनातून एखाद्या प्रसंगात कोणत्याही खेळाडूने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याला आमचा पाठिंबा नसतो. दोघांचेही ते वैयक्तिक मत होते. आपल्याकडून काय चूक झाली हे त्यांना कळले असावे. या प्रकरणाचे गांभीर्य देखील कळले असावे,’ असे विराटने स्पष्ट केले. हार्दिक पांड्याने केलेल्या वक्तव्याची बीसीसीआयनेही गंभीर दखल घेतली आहे. विनोद राय यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट प्रशासकीय समितीने हार्दिक आणि लोकेश राहुलवर दोन सामन्यांच्या बंदीची शिफारस केली होती. आता या प्रकरणी चौकशी होईपर्यंत दोघांवर निलंबणाची कारवाई झाल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून दोघेही बाहेर पडणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. ‘काही गोष्टी आपल्या हातात नसल्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण आहे,’ असे सांगून विराटने नाराजी जाहीर केली. ‘या दोघांच्या अनुपस्थितीचा संघावर काहीही परिणाम होणार नाही. कसोटी मालिकेतील यशानंतर संघाचे मनोबल उंचावले आहे. अशाप्रकाराच्या गोष्टींवर माझे नियंत्रण नसल्याने परिस्थितीशी ताळमेळ साधण्यास मी सज्ज असतो. या दोघांवर कारवाई झाली तरी संघाच्या कामगिरीवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही,’ असेही कोहलीने सांगितले.

टॅग्स :विराट कोहलीहार्दिक पांड्याकरण जोहर