Join us  

विश्वविजेत्या कर्णधारांना IND vs AUS फायनलसाठी निमंत्रण; पाकिस्तानचे इम्रान खान मात्र तुरूंगातच

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक फायनलसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 8:17 PM

Open in App

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील विश्वचषक फायनलसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी या सामन्यासाठी हजेरी लावणार असल्याचे कळते. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा बहुचर्चित सामना खेळवला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने विश्वचषक २०२३च्या अंतिम सामन्यासाठी १९७५ ते २०१९ पर्यंतच्या सर्व विश्वचषक चॅम्पियन कर्णधारांना आमंत्रित केले आहे. मात्र, पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान तुरूंगात असल्याने या कार्यक्रमाला मुकणार आहेत. त्यांच्या नेतृत्वात १९९२ मध्ये शेजाऱ्यांनी विश्वचषक उंचावला होता. याशिवाय श्रीलंकेला चॅम्पियन बनवणारे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा हे येणार का हे देखील पाहण्याजोगे असेल. कारण अलीकडेच त्यांनी बीसीसीआय सचिव जय शहा यांच्यावर गंभीर आरोप करताना श्रीलंका क्रिकेट बोर्डाची अवस्था खराब होण्यामागे शहांचा हात असल्याचे म्हटले होते. 

दरम्यान, मागील विश्वचषक विजेत्या कर्णधारांसाठी आयसीसी विशेष ब्लेझरची व्यवस्था करणार आहे. विश्वविजेत्या कर्णधारांमध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. वेस्ट इंडिजचे क्लाइव्ह लॉयड, भारताचे कपिल देव, ऑस्ट्रेलियाचे अॅलन बॉर्डर, पाकिस्तानचेइम्रान खान, श्रीलंकेचे अर्जुन रणतुंगा, ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह वॉ, रिकी पाँटिंग, भारताचा महेंद्रसिंग धोनी, ऑस्ट्रेलियाचा मायकल क्लार्क आणि इंग्लंडचा इऑन मॉर्गन यांचा या यादीत समावेश आहे. मात्र, इम्रान खान तुरूंगात असल्यामुळे फायनलच्या लढतीचे साक्षीदार होणार नाहीत तर अर्जुन रणतुंगा हे देखील न येण्याची दाट शक्यता आहे.

जय शहांवर रणतुंगांचे गंभीर आरोप"श्रीलंका क्रिकेट बोर्डातील अधिकारी आणि जय शहा यांच्यातील संबंधांमुळे बीसीसीआयचे आमच्या बोर्डावर नियंत्रण होते. जय शहा हेच श्रीलंका बोर्ड चालवायचे. त्यांच्या दबावामुळेच बोर्ड उद्ध्वस्त झाले. भारताचा एक माणूस श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाला सुरूंग लावत आहे", अशा शब्दांत रणतुंगा यांनी शहांवर टीकेचे बाण सोडले. तसेच जय शहा हे केवळ त्यांच्या वडिलांमुळेच शक्तीशाली आहेत. कारण त्यांचे वडील अमित शहा भारताचे गृहमंत्री आहेत, असेही रणतुंगा यांनी नमूद केले. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामहेंद्रसिंग धोनीआयसीसीइम्रान खानपाकिस्तान