अखेरपर्यंत रंगलेला न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना शेवटी अनिर्णितावस्थेत समाप्त झाला. या लढतीत न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या ५३१ धावांच्या आव्हानाचा वेस्ट इंडिजच्या संघाने जोरदार पाठलाग केला. जस्टिन ग्रिव्हच्या जबरदस्त द्विशतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने पाचव्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ६ बाद ४५७ धावांपर्यंत मजल मारली होती. अखेरीस वेस्ट इंडिजला विजयासाठी केवळ ७४ धावा कमी पडल्या आणि हा रोमांचक सामना अनिर्णित राहिला.
या सामन्यातील पहिल्या डावात न्यूझीलंडलने २३१ धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल फलंदाजीस उतरलेल्या वेस्ट इंडिजचा डाव केवळ १६७ धावांत समाप्त झाला होता. न्यूझीलंडला पहिल्या डावात ६४ धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर रचिन रवींद्रने केलेल्या १७६ धावांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने आपला दुसरा डाव ४६६ धावा कुटून घोषित केला होता. तसेच वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ५३१ धावांचे आव्हान ठेवले होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने चौथ्या दिवसअखेर ४ बाद २१२ धावांपर्यंत मजल मारली होती. दरम्यान, पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यावर शतकवीर शाई होपसह (१४०), टेविक इम्लॅच (४) झटपट बाद झाल्याने वेस्ट इंडिजची अवस्था ६ बाद २७७ अशी झाली होती.
कॅरेबियन संघाला पराभव समोर दिसत होता. अशा परिस्थितीत जस्टिन ग्रिव्हस (नाबाद २०२) आणि केमार रोच (नाबाद ५८) यांनी सातव्या विकेटसाठी १८० धावा काढून सामन्यात रंगत आणली. मात्र निर्धारित षटके संपत आल्याने अखेरीस सामना अनिर्णित राहिला. २०२ धावांची झुंजार खेळी करणारा ग्रिव्हस सामन्याचा मानकरी ठरला.