पाकिस्तान क्रिकेट संघानं न्यूझीलंड विरुद्धचा तिसरा टी-२० सामना जिंकून ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील आपले आव्हान कायम ठेवले आहे. पहिल्या दोन सामन्यातील लाजिरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तान संघानं २०० धावांचा पाठलाग करताना खास विक्रमाची नोंद केली. अवघ्या १६ षटकात २०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघानं फक्त एक विकेट गमावली. हा एक रेकॉर्डच आहे. अन्य कोणत्याही संघाला जे जमलं नाही ते पाकिस्तानच्या संघानं करून दाखवलंय. तिसऱ्यांदा २०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने ९ विकेट्स राखून विजय नोंदवला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
२०० पारच्या लढाईत पाकचा विक्रमी पराक्रम
न्यूझीलंड येथील ऑकलंडच्या मैदानात रंगलेल्या पाकिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाकडून मार्क चॅपमॅन याने ४४ चेंडूत ११ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने केलेल्या ९४ धावांच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघानं सर्व बाद २०४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मोहम्मद हारीस याने २० चेंडूत ४१ धावांची तुफान फटकेबाजी केली. तो आउट झाल्यावर हसन नवाझ याने १० चौकार आणि ७ षटकाराच्या मदतीने ४५ चेंडूत नाबाद १०५ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला सलमान अली आगानं नाबाद अर्धशतक झळकावले. १६ व्या षटकातच विक्रमी विजयाची नोंद केली.
याआधी दोन वेळा केला होता असा पराक्रम
याआधी पाकिस्तानच्या संघानं २०२२ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात २०३ धावांचा पाठलाग करताना ९ विकेट्स राखून विजय नोंदवला होता. याशिवाय २०२१ मध्ये पाकिस्तानच्या संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१ धावांचा यशस्वी पाठलाग करताना देखील ९ विकेट राखून बाजी मारली होती. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करत असताना पाकिस्तानच्या संघाने मिळवलेला हा दुसऱ्या क्रमांकाचा विजय आहे.