NZ vs BAN, 1st Test : आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ( WTC) गतविजेत्या न्यूझीलंड संघाला पहिल्या कसोटी बांगलादेशनं कोंडीत पकडले आहे. न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील ३२८ धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशनं ४५८ धावा उभ्या केल्या आणि किवींचा दुसऱ्या डावात पाच विकेटही गुंडाळल्या. चौथ्या दिवसअखेरीस किवींकडे १७ धावांची नाममात्र आघाडी आहे. पण, ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या बांगलादेशनं चौथ्या दिवशी एक चूक केली आणि जगात हसू करून घेतलं. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वाईट DRS त्यांनी घेतला.
डेव्हॉन कॉनवे ( १२२), विल यंग ( ५२) व हेन्री निकोल्स ( ७५) यांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडनं पहिल्या डावात ३२८ धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशकडून लिटन दास ( ८६), कर्णधार मोमिनूल हक ( ८८), महमुदुल हसन जॉय ( ७८), नजमूल होसैन शांतो ( ६४) व  मेहिदी हसन ( ४७) यांनी दमदार खेळ करताना संघाला ४५८ धावांचा डोंगर उभा करून दिला. न्यूझीलंडला दुसऱ्या डावातही काही खास करता आले नाही आणि त्यांचा निम्मा संघ १४७ धावांवर माघारी परतला आहे. इबादत होसैननं चार विकेट्स घेत किवींना पराभवाच्या दिशेनं ढकलले आहे.
विल यंग ( ६९) व रॉस टेलर ( ३७*) यांनी संघर्ष दाखवला. याच टेलरला बाद करण्यासाठी बांगलादेशनं घेतलेला DRS चर्चेचा विषय ठरला आहे. चेंडू बॅटवर आदळल्याचे स्पष्ट दिसत असूनही बांगलादेसच्या खेळाडूंनी LBW साठी DRS घेतला आणि रिप्लेत जे दिसले ते पाहून साऱ्यांनाच हसू आवरले नाही.