मेलबर्न : मैदानाबाहेरील वादांमुळे अडचणीत सापडलेला इंग्लंडचा संघ शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी मैदानात उतरेल. पाच सामन्यांच्या या ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने पहिले तिन्ही सामने अवघ्या ११ दिवसांत जिंकून ३-० अशी अजेय आघाडी घेतली आहे. या दौऱ्यावर इंग्लंडची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही सपशेल अपयशी ठरली आहे. त्यातच खेळाडूंच्या बेशिस्तीमुळे संघ अडचणीत आला आहे. सलामीवीर बेन डकेट सुट्टीदरम्यान मद्यधुंद अवस्थेत हॉटेलचा रस्ता विसरल्याचे प्रकरण असो किंवा जेकब बेथेलचा क्लबमधील डान्स व्हिडीओ व्हायरल होणे, यामुळे संघाच्या प्रतिमेला तडा गेला आहे. सर्वांत मोठा फटका म्हणजे प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे.
...म्हणून 'बॉक्सिंग डे'
ख्रिसमसच्या पुढच्या दिवशी (२६ डिसेंबर) ब्रिटन आणि इतर राष्ट्रकुल देशांमध्ये सुट्टी असते. पूर्वी या दिवशी लोक एकमेकांना भेटवस्तूंचे डबे (बॉक्सेस) देत असत किंवा चर्चमधील दानपेटी (अल्म्स बॉक्स) उघडली जात असे. त्यावरूनच २६ डिसेंबरच्या दिवसाला 'बॉक्सिंग डे' असे नाव पडले.
वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व राहणार
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडची (एमसीजी) खेळपट्टी इंग्लंडच्या अडचणीत आणखीन भर टाकण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज आणि प्रभारी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने सांगितले की, खेळपट्टीच्या स्वरूपानुसार संघ निवडावा लागतो. येथील खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मोठी मदत मिळेल असे दिसते. फिरकीपटू नॅथन लायन आणि नियमित कर्णधार पॅट कमिन्स यांच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा झाय रिचर्डसन, ब्रेंडन डोगेट आणि मायकेल नेसेर यांच्या खांद्यावर असेल. नॅथन लायनला ॲडलेड कसोटीत दुखापत झाली होती. खेळपट्टीची स्थिती पाहता ऑस्ट्रेलियाने वेगवान गोलंदाजांनाच संघात स्थान दिले आहे.