लॅव्हर : नोव्हाक जोकोव्हिच आणि रॉजर फेडरर हे टेनिस जगतातील दोन दिग्गज जेव्हा एकाच कोर्टवर येतात तो क्षण मनमुराद अनुभवायचा असतो. पण जेव्हा हे प्रतिस्पर्धी खेळाडू एक संघ म्हणून खेळतात, तेव्हा तर दोघांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच. अनेक ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकलेले हे खेळाडू लॅव्हर कपच्या निमित्ताने एकत्र खेळले. जोकोव्हिच आणि फेडरर यांनी पुरुष दुहेरीत जोडीने खेळताना केव्हिन अँडरसन आणि जॅक सोक यांचा सामना केला. पण या लढतीत एक किस्सा असा घडला की जोकोव्हिचसह चाहत्यांनाही हसू आवरले नाही.
लॅव्हर कपच्या पहिल्याच सामन्यात हा प्रसंग घडला. एकेरीत हात बसलेल्या या खेळाडूंना दुहेरीत लय सापडायला थोडा वेळ गेला. दुहेरीत आवश्यक असलेला अनुभव त्यांच्याकडे नसल्याने हा प्रसंग घडला. जॅक सोकच्या परतीचा फटका परतवताना जोकोव्हिचने चेंडूवर जोरदार फटका मारला. पण तो चेंडू प्रतिस्पर्धीच्या कोर्टवर न पोहोचता सहकारी फेडररच्या कमरेवर आदळला आणि जोकोव्हिचला हसू आवरले नाही.
या प्रसंगानंतर जोकोव्हिचने त्वरित फेडररकडे धाव घेतली आणि माफी मागितली. फेडररला चेंडूचा थोडासा फटका बसला, परंतु त्याने त्वरित जोकोव्हिचला हात मिळवला. अँडरसन आणि सोक यांच्याकडे दुहेरीचा अनुभव असल्याने त्यांनी हा सामना ६-७, ६-३, १०-६ असा जिंकला.