Join us  

"विराट-रोहितची विकेट नव्हे, हा ठरला फायनलचा 'टर्निंग पॉईंट"; इरफान पठाणचं स्पष्ट मत

घरच्या मैदानावर भारताचा World Cup Final फायनलच्या सामन्यात एकतर्फी पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 9:30 AM

Open in App

IND vs AUS World Cup Final : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा पराभव पाहून सर्वांचे डोळे ओलावले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. चाहत्यांसाठीही हा मोठा धक्का होता कारण टीम इंडियाने याआधी संपूर्ण स्पर्धेत एकही सामना गमावला नव्हता. पण एका पराभवाने संपूर्ण स्पर्धेच्या मेहनतीवर पाणी फेरले. काहींनी रोहित शर्मा तर काहींनी विराट कोहलीची विकेट टर्निंग पॉईंट ठरल्याचे म्हटले. पण भारताचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने एक विधान केले आणि सामन्यातील वेगळाच टर्निंग पॉईंट सांगितला.

इरफान पठाण म्हणाला, "विश्वचषकातील पराभव पचवणे अवघड होते कारण भारतीय संघ मागे वळून पाहताना बऱ्याच चुका झाल्या. शेवटच्या षटकांमध्ये जाडेजा आणि सूर्यकुमार यादवकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. त्यांना ते जमले नाही. पण माझ्या मते जेव्हा केएल राहुल आऊट झाला, तेव्हा तो सामन्याचा टर्निंग पाईंट होता. ती वेळ अशी होती जेव्हा भारताला धावसंख्या पुढे नेता आली नाही. तो खेळताना कव्हर आणि मिड-ऑफ दोन्ही बाजूला फिल्डर नव्हते. तो फूटवर्क करून स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न करू शकला असता. पण त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना संधी दिली. त्यात ट्रेव्हिस हेड आणि मार्श यांनी गोलंदाजी करून भारतीय फलंदाजांवर दबाव आणला."

ऑस्ट्रेलियाने चांगले नियोजन केले

इरफान पठाण म्हणाला, "ऑस्ट्रेलियाने चांगले नियोजन केले त्यामुळे त्यांनी फायनलचा सामना जिंकला. इरफानने सांगितले की, ऑस्ट्रेलियाने अशा खेळपट्टीवर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता जेथे संध्याकाळी दव पडू शकेल. त्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे झाले. त्यांच्याकडे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होते, ज्यांनी चमकदार कामगिरी केली. भारताच्या नियोजनात त्रुटी असल्याने त्यांनी सामना गमावला. ऑस्ट्रेलिया हा उत्तम नियोजित संघ होता. नाणेफेकीपासून त्यांनी ज्या पद्धतीने नियोजन केले, ते खूपच महत्त्वाचे ठरले."

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपइरफान पठाणरोहित शर्माविराट कोहलीलोकेश राहुलभारतआॅस्ट्रेलिया