Join us

Sunil Gavaskar Iceman, IPL 2022 : ना धोनी, ना विल्यमसन... सुनील गावसकर म्हणतात, "हा खरा IPL मधला 'आईसमॅन"

"कितीही दडपणाची स्थिती असली तरी तो थंड डोक्याने खेळतो"; गावसकरांकडून पावती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 17:55 IST

Open in App

Sunil Gavaskar Iceman, IPL 2022 : भारतात सध्या IPL 2022 ची धूम सुरू आहे. दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजी अशी चांगलीच धुमश्चक्री प्रत्येक सामन्यात पाहायला मिळत आहे. यंदाच्या हंगामात जुन्या ८ संघांसमवेत दोन नवे संघही दाखल झाले आहेत. त्यामुळे १० संघांमध्ये असलेली स्पर्धा अधिक तीव्र असल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान, भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी या स्पर्धेतील एका खेळाडूची स्तुती केली आहे. महेंद्रसिंग धोनी किंवा केन विल्यमसन या खेळाडूंना क्रिकेट जगतातील थंड डोक्याचे क्रिकेटपटू अशी ओळख मिळाली आहे. पण गावसकर यांनी मात्र एका तुलनेने नवीन खेळाडू 'आईसमॅन'ची उपमा दिली आहे.

गुजरात टायटन्स संघासाठी हंगामातील दोन सामने जिंकवून देणारा राहुल तेवातिया हा पुन्हा एकदा सर्वोत्तम फिनिशर म्हणून नावलौकिक कमावत आहे. राहुल तेवातियाने कठीण प्रसंगात आणि मोक्याच्या क्षणी संघाला दमदार गोलंदाजीच्या जीवावर विजय मिळवून दिला आहे. त्यामुळेच राहुल तेवातिया हा यंदाच्या IPL चा आईसमॅन (थंड डोक्याने चांगली कामगिरी करणारा माणूस) असल्याची स्तुती भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी केली आहे. गावसकर यांच्या मते राहुल तेवातिया हा दडपणाच्या प्रसंगात अजिबात डगमगत नाही. उलट तो अतिशय शांत आणि थंड डोक्याने विचार करतो. हाच त्याच्या यशाचा मंत्र आहे.

सुनील गावसकर म्हणाले की शारजाहच्या मैदानात IPL 2020 मध्ये शेल्डन कॉट्रेलला राहुल तेवातियाने एकाच षटकात तब्बल पाच षटकार लगावले होते. त्यानंतर राहुल तेवातियाला विश्वास वाटू लागला की तो उत्तम फटकेबाजी करू शकतो. सध्याही तो गुजरातच्या संघाकडून दमदार लयीत आहे. त्याचसोबत त्याला भारतीय टी२० संघात स्थान मिळण्याचीही चर्चा रंगू लागली आहे.

"शाहजाच्या मैदानावर राहुल तेवातियाने पाच षटकार मारत आत्मविश्वास कमावला. आपण असंभव गोष्टीही संभव करू शकतो असा विश्वास त्याच्या मनात निर्माण झाला. त्याने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. शेवटच्या टप्प्यातील षटकांमध्ये फलंदाजी करताना त्याच्या बॅटिंगमध्ये आत्मविश्वास झळकतो. तो चेंडू पाहून मगच फटकेबाजी करतो. त्याच्याकडे सर्व प्रकारचे फटके खेळण्याची क्षमता आहे, पण महत्त्वाची बाब म्हणजे मोक्याच्या क्षणी तो थंड डोक्याने विचार करतो आणि चांगली फलंदाजी करतो. त्यामुळेच राहुल तेवातिया हा 'आईसमॅन' आहे", असे गावसकर म्हणाले.

"आईसमॅन म्हणण्यामागे कारण हेच की तो जेव्हा मैदानात फलंदाजी करत असतो, त्यावेळी तो घाबरत नाही. चेंडू नक्की कसा येतोय त्याचा तो नीट अंदाज घेतो आणि कोणता फटका खेळायचा याचा तो विचार करून त्यानुसार खेळतो", असे गावसकरांनी नमूद केले.

टॅग्स :आयपीएल २०२२सुनील गावसकरगुजरात टायटन्समहेंद्रसिंग धोनीकेन विल्यमसन
Open in App