Join us

ना हार्दिक, ना केएल राहुल; रोहित शर्मानंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी एबी डिव्हिलियर्सने सुचवले वेगळेच नाव

भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेनंतर भारतीय संघात बदलाचे वारे पाहायला मिळणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा अखेरचा वर्ल्ड कप असेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 20:16 IST

Open in App

भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेनंतर भारतीय संघात बदलाचे वारे पाहायला मिळणार आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा अखेरचा वर्ल्ड कप असेल. कर्णधारपदाच्या शर्यतीत हार्दिक पांड्या, लोकेश राहुल व रिषभ पंत हे नाव चर्चेत आहेत आणि BCCI चीही या नावांना पसंती आहे. पण, नुकतंच राहुलला कसोटी संघाच्या उप कर्णधारपदावरून हटवण्यात आले, रिषभ पंत अपघातामुळे २०२३ चा हंगाम खेळण्याची शक्यता नाहीच आहे. दुसरीकडे हार्दिक पांड्या ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद भूषवित आहेत आणि कसोटीत त्याच्या पुनरागमनावर अनिश्चितता आहे. अशात रोहितनंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिव्हिलियर्सने युवा फलंदाज संजू सॅमसन ( Sanju Samson) याचे नाव सुचवले आहे. सॅमसनला संघात नियमित स्थान मिळत नसताना एबीच्या या सल्ल्याने सर्वांना आश्चर्य वाटतेय.

''संजू सॅमसन अविश्वसनीय खेळाडू आहे. तो परिपक्व आहे, शांत आणि संयमी माणूस आहे. रणनीतिकदृष्ट्या मला वाटते की तो खूप चांगला आहे. मला असे वाटते की तो अजूनही सुधारणा करू शकतो आणि कालांतराने तो अजूनही परिपक्व होईल. कारण त्याला अधिक अनुभव मिळेल आणि जॉस बटलर सारख्या व्यक्तीसोबत जास्त वेळ घालवत आहे. तिथे त्याला खूप काही शिकायला मिळते,''असे एबीने Jio Cinemas वर बोलताना सांगितले.

“परंतु मला वाटते की त्याच्याकडे एक अद्भुत कर्णधार होण्याचे सर्व श्रेय आहेत. कोणास ठाऊक, शक्यतो वर्षातून एक दिवस किंवा दोन किंवा तीन वेळा, भारतीय संघातील एका फॉरमॅटमध्ये तो सहज कर्णधार होऊ शकतो. तो दीर्घकाळ कर्णधार म्हणून राहू शकला, तर तो कमाल करून दाखवेल,'' असेही त्याने म्हटले.  

सॅमसनने राजस्थान रॉयल्स (RR) चे नेतृत्व करताना मागील पर्वात संघाला फायनलमध्ये घेऊन गेला होता. अद्याप T20I आणि ODI संघात आपले स्थान निश्चित करता आलेले नाही. अलीकडेच  गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या वनडे मालिकेतूनही बाहेर पडावे लागले. केरळच्या या फलंदाजाने १६ डावांत ३०१ धावा केल्या आहेत, त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. वन डेत त्याने १० डावांत ६६ च्या सरासरीने दोन अर्धशतकांसह ३३०धावा केल्या आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :एबी डिव्हिलियर्ससंजू सॅमसनहार्दिक पांड्यारोहित शर्मालोकेश राहुल
Open in App