भारताचा माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन याने आगामी पुरुषांच्या टी-२० विश्वचषकावरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदवर तीव्र शब्दांत टीका केली. आयसीसी स्पर्धांची अतिसंख्या आणि संघांमधील गुणवत्तेची वाढती दरी यामुळे प्रेक्षकांचा खेळातील रस कमी होत असल्याचा खळबळजनक दावा अश्विनने केला आहे. त्यामुळे यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही, असेही तो म्हणाला. अश्विनचे हे वक्तव्य सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.
अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना स्पष्ट केले की, स्पर्धेतील सुरुवातीचे सामने अत्यंत एकतर्फी होत आहेत. "यावेळी टी-२० विश्वचषक पाहण्यात कोणालाही रस नसेल. भारत विरुद्ध अमेरिका आणि त्यानंतर भारत विरुद्ध नामिबिया यांसारखे सामने चाहत्यांना क्रिकेटपासून दूर नेतील. पूर्वी विश्वचषक चार वर्षांतून एकदा व्हायचा, तेव्हा प्रेक्षकांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळायचा. सुरुवातीच्या टप्प्यात भारत, इंग्लंड किंवा श्रीलंका यांसारख्या बलाढ्य संघांशी भिडायचा, जे पाहणे अधिक थरारक होते", असे तो म्हणाला.
अश्विनने व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रकावरही ताशेरे ओढले. २०१० पासून दरवर्षी जवळपास एक मोठी आयसीसी स्पर्धा खेळवली जात आहे. अश्विन म्हणाला की, २०२१ मध्ये टी-२० विश्वचषक (कोविडमुळे लांबलेला), २०२२ मध्ये टी-२० विश्वचषक, २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक, २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक, २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यात आली आणि आता २०२६ मध्ये टी-२० विश्वचषक होणार आहे." अश्विनच्या मते, दरवर्षी होणाऱ्या या स्पर्धांमुळे विश्वचषकाला एक खास ओळख होती, ती आता पुसली जात आहे. वारंवार होणाऱ्या या स्पर्धांमुळे प्रेक्षकांमधील रस कमी होत आहे.
येत्या ७ फेब्रुवारी २०२६ पासून भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे टी-२० विश्वचषकाचे आयोजन करणार आहेत. २० संघांच्या या स्पर्धेत भारत गतविजेता म्हणून मैदानात उतरेल. मात्र, भारताचा पहिलाच सामना युनायटेड स्टेट्स विरुद्ध असल्याने अश्विनने या फॉरमॅटवर शंका उपस्थित केली. वरच्या स्तरातील संघ आणि नवख्या संघांमधील गुणवत्तेत मोठी तफावत असल्याने प्रेक्षकांना स्पर्धेच्या सुरुवातीला खिळवून ठेवणे कठीण जाईल, असे त्याला वाटते.