Shahid Afridi to James Faulkner : पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( PSL) शनिवारी मोठा धमाका झाला. ऑस्ट्रेलियन गोलंदाज जेम्स फॉल्कनरने PSLमधून माघार घेताना वेतन न दिल्याचा आरोप पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर ( PCB) केला. 'पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मानधनाबाबत केलेल्या कराराचे पालन केले नाही. बोर्ड सतत माझ्याशी खोटं बोलत राहिलं', असा गंभीर आरोप फॉल्कनरने PCB वर केला. जेम्स फॉल्कनर हा PSL मधील क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाचा भाग होता. मात्र, तो स्पर्धा सोडून गेल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आता फॉल्कनरला उत्तर देण्यासाठी माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी मैदानावर उतरला आहे.
जेम्स फॉल्कनर काय म्हणाला?
''पाकिस्तान क्रिकेट फॅन्सची मी मनापासून माफी मागतो, परंतु दुर्दैवाने मला PSLमधील अखेरच्या दोन सामन्यांतून माघार घ्यावी लागल आहे आणि मी PSLलही सोडत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मला वेतनाबाबत दिलेला शब्द पाळला नाही. त्यांच्याशी याबाबत मी वारंवार चर्चा करत होतो, परंतु ते सतत खोटं बोलत राहिले,''असे फॉल्करनरे ट्विट केले.
त्याने पुढे लिहिले की,''पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन व्हाये, यासाठी मला मदत करायची होती. इथे अनेक उदयोन्मुख खेळाडू आहेत आणि चाहते अमेझिंग आहेत. पण, PCB व PSL यांच्याकडून मिळालेली वागणुक खेदजनक आहे.''
फॉल्कनरच्या या वागण्याने शाहिद आफ्रिदी निराश झाला. पाकिस्तानच्या माजी खेळाडूने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बाजू घेताना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजावर पलटवार केला. तो म्हणाला,'' पाकिस्तानच्या आदरातिथ्याला व आयोजनावर टीका करणाऱ्या फॉल्कनरच्या वक्तव्याने निराश झालो आहे. त्याचे आरोप बिनबुडाचे आहेत. त्याला आम्ही सर्वांनी आदराची वागणुक दिली आणि वेतनही कधी थकले नाही. पाकिस्तान, पाकिस्तानचे क्रिकेट आणि PSL ब्रँड यांना कोणालाही कलंकित करण्याची परवानगी नाही.''
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानुसार फॉल्कनरला ७० टक्के वेतन देण्यात आलेले आहे. पीसीबीने फॉल्कनरवर बंदी घातली आहे.