Nita Ambani Cricket in Life : भारतातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा म्हणजे IPL. ही टी२० लीग स्पर्धा केवळ लोकप्रियच नाही तर जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट स्पर्धादेखील आहे. त्याचे कारण या स्पर्धेत भारतातील बड्या उद्योजकांनी संघ विकत घेतले आहेत. IPL मधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक म्हणजे मुंबई इंडियन्स. मुंबईच्या ( Mumbai Indians ) सामन्यात जसे रोहित शर्मा किंवा जसप्रीत बुमराह हमखास दिसतात, तशाच खेळाडूंसोबत डगआउटमध्ये बसलेल्या संघमालक नीता अंबानीदेखील हमखास दिसतात. जगातील श्रीमंत कुटुंबातील सदस्य असूनही त्या IPL सामन्यांमध्ये VIP रूममध्ये न बसता डगआउटमध्ये ( Team Dugout ) का बसतात, असा प्रश्न अनेकांना पडत असेल. याचे उत्तर त्यांनी नुकतेच हार्वर्ड कॉन्फरन्स २०२५ मधील मुलाखतीत दिले आहे.
काय म्हणाल्या नीता अंबानी?
नीता अंबानी यांचं क्रिकेटशी कनेक्शन कसं जुळलं याबाबत त्यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिले. "मला क्रिकेट खूप आवडतं. वयाच्या ४४ व्या वर्षी माझ्या आयुष्यात क्रिकेटचा संबंध आला. बहुतांश खेळाडू या वयाचे झाले की निवृत्त होतात. पण माझी तिथून सुरुवात झाली. मुकेश अंबानी यांनी त्यावेळी मुंबई इंडियन्स संघ विकत घेतला होता. संघात खूप मोठमोठे खेळाडू होते पण तरीही संघ गुणतालिकेत तळाशी असायचा. आम्ही दक्षिण आफ्रिकेत खेळत होतो. मी मुंबई संघाला चिअर करायला तेथे गेलो होते. आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी म्हणून मी निर्णय घेतला की VIP रूममध्ये न बसता थेट खेळाडूंसोबत डगआउटमध्ये बसायचं," असं नीत अंबानी म्हणाल्या.
डगआउटमध्ये काय घडलं?
"खेळाडूंच्यात जाऊन डगआउटमध्ये बसायचं असं मी का ठरवलं मला माहिती नाही, पण मला वाटलं तसं मी केलं. डगआउटमध्ये माझ्या एका बाजूला सचिन तेंडुलकर तर दुसऱ्या बाजूला झहीर खान बसलेले होते. कुठल्याही गोष्टीत कळत नसेल तर शंका विचारत राहायच्या हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे मी सचिनला विचारलं की एक गोलंदाज लांबून येऊन बॉलिंग करतोय, दुसरा जवळूनच बॉलिंग करतोय, असं का? तेव्हा सचिनने मला सांगितलं की एक जण वेगवान गोलंदाजी आहे तर दुसरा फिरकीपटू आहे. त्यावेळी मला क्रिकेटमधलं काहीच कळत नव्हतं. पण आता मला लेग स्पिन, ऑफ स्पिन, रिस्ट स्पिन, गुगली, शॉर्ट बॉल, यॉर्कर सगळं कळतं. चेंडू कुठे टप्पा पडेल, फलंदाज कसा फटका खेळेल याचाही मला अंदाज बांधता येतो. क्रिकेटने माझ्या आयुष्यात खेळाविषयी प्रेम निर्माण केलं," असं नीता अंबानी यांनी अभिमानाने सांगितलं.
Web Title: Nita Ambani tells how cricket entered her life and gave her a lifelong love for sport at Harvard India Conference
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.