कोलंबो : अत्यंत चुरशीच्या झालेल्या निर्णायक सामन्यात बांगलादेशने जबरदस्त झुंज देत यजमान श्रीलंकेचा २ गड्यांनी पराभव करुन तिरंगी टी२० मालिकेच्या अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. रविवारी होणाऱ्या जेतेपदाच्या लढतीत बांगलादेशपुढे बलाढ्य भारताचे तगडे आव्हान असेल. अत्यंत नाट्यमय झालेल्या या लढतीत लंकेने दिलेले १६० धावांचे आव्हान बांगलादेशने ८ फलंदाजांच्या मोबदल्यात आणि एक चेंडू राखून पार केले.
आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या थरारक सामन्यात मिळालेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने दमदार खेळ केला. संपूर्ण स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या महमुद्दुल्लाह याने निर्णायक सामन्यात फॉर्ममध्ये येताना १८ चेंडूत ३ चौकार व २ षटकारांसह नाबाद ४३ धावांची विजयी तडाखा दिला. २ बाद ३३ अशी अडखळती सुरुवात झाल्यानंतर सलामीवीर तमिम इक्बालने सर्व सूत्रे आपल्याकडे घेत मुशफिकुर रहिमसह (२८) तिसºया गड्यासाठी ६४ धावांची भागीदारी केली. तमिमने ४२ चेंडूत ४ चौकार व २ षटकारासह ५० धावांची खेळी केली. तमिम बाद झाल्यानंतर महमुद्दुल्लाने अखेरपर्यंत टिकून राहत संघाला अंतिम फेरीत नेले.
तत्पूर्वी, कुसल परेरा (६१) आणि कर्णधार थिसारा परेरा (५८) यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये झळकावलेल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेने २० षटकात ७ बाद १५९ अशी समाधानकारक मजल मारली. बांगलादेशने भेदक मारा करत यजमानांच्या फलंदाजीला खिंडार पाडले होते. बांगलादेशने अचूक मारा करत श्रीलंकेची ९व्या षटकात ५ बाद ४१ धावा अशी बिकट अवस्था केली होती. यावेळी लंका शंभरीच्या आत गारद होणार, अशी शक्यता निर्माण झाली होती.
मात्र, एका बाजूने टिकून राहिलेल्या मेंडिसने कर्णधार थिसारासह किल्ला लढवत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. कुसलने ४० चेंडूत ७ चौकार व एका षटकारासह ६१ धावांचा तडाखा दिला. थिसाराने ३७ चेंडूत ३ चौकार व ३ षटकारांसह ५८ धावा चोपल्या. दोघांनी सहाव्या गड्यासाठी ९७ धावांची निर्णायक भागीदारी केली. यामुळे लंकेने ५ बाद ४१ वरुन ६ बाद १३८ धावा असे पुनरागमन केले.
अखेरच्या षटाकात घडले नाट्य
बांगलादेशला विजयासाठी १२ धावांची गरज असताना वेगवान गोलंदाज उसुरु उडाना याने सलग दोन बाऊन्सर टाकले आणि पंचांनी नो बॉल न दिल्याने तसेच यावेळी मुस्तफिजूर रहमान धावबाद झाल्याने बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन संतापला. यावेळी त्याने फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये बोलावण्याचा इशारा करत सामना काहीवेळ थांबवलाही. मात्र काहीवेळाने सामना पुन्हा सुरु झाल्यानंतर महमुद्दुल्लाहने चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर अनुक्रमे चौकार व षटकार ठोकत बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : २० षटकात ७ बाद १५९ धावा (कुसल परेरा ६१, थिसारा परेरा ५८; मुस्तफिझूर रहमान २/३९) पराभूत वि. बांगलादेश १९.५ षटकात ८ बाद १६० धावा (तमिम इक्बाल ५०, महमुद्दुल्लाह नाबाद ४३; अकिला धनंजय २/३७)