New Zealand vs England, 1st Test :न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना क्राइस्टचर्चच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळात न्यूझीलंडच्या संघानं ८ बाद ३१९ धावा केल्या आहेत. या सामन्यात स्टार बॅटर केन विलियम्सन याने संघाकडून सर्वाधिक धावा केल्या. पण त्याचे शतक अवघ्या ७ धावांनी हुकले. यासह तो नव्वदीच्या घरात आउट होणाऱ्या क्लबमध्ये सचिन तेंडुलकर पाठोपाठ आता तो दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.
१३ व्या वेळी नव्वदीच्या घरात फसला केन
न्यूझीलंडच्या डावातील ६१ व्या षटकात गस ॲटकिन्सन याने जॅक क्राउलकरवी झेलबाद केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १३ व्या वेळी तो नर्व्हस नाइंटीजचा शिकार झाला. सर्वाधिक वेळा नर्व्हस नाइंटीचा शिकार होणारा तो क्रिकेट जगतातील दुसरा फलंदाज ठरलाय. या यादीत राहुल द्रविड तिसऱ्या क्रमांकावर आहे. तो आपल्या कारकिर्दीत १२ वेळा नव्वदीच्या घरात आउट झाला होता.
सर्वाधिक वेळा सचिनवर ओढावलीये ही नामुष्की
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा नव्वदीच्या घरात बाद होण्याचा नकोसा विक्रम हा शतकांचा बादशहा सचिन तेंडुलकरच्या नावेच आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या आतंरराष्ट्रीय कारकिर्दीत तब्बल २७ वेळा 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार झाला आहे. आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावे सर्वाधिक धावांसह सर्वाधिक १०० शतकांचा विक्रम आहे. नव्वदीच्या घरातील निम्मी शतके जरी झाली असती तर सर्वाधिक शंभीराचा त्याचा विक्रम आणखी मजबूत दिसला असता.
ग्लेन फिलिप्स अर्धशतकाच्या उंबरठ्यावर
पहिल्याच कसोटी सामन्यात टॉस गमावल्यानंतर न्यूझीलंडच्या संघावर पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ आली. केनच्या खेळीला ब्रेक लागला असला तरी ग्लेन फिलिप्स अजूनही मैदानात टिकून आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी तो ४१ धावांवर नाबाद होता. केन विलियम्सनशिवाय एकाही फलंदाजाला या सामन्यात अर्धशतकापर्यंत पोहचता आलेले नाही. ग्लेन फिलिप्स आपली खेळी मोठी करुन हा डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल. इंग्लंडकडून शोएब बशीरनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या आहेत.