नवी दिल्ली : अनुभवी मिताली राज हिच्याकडे न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय महिला एकदिवसीय संघाचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले असून हरमनप्रीत कौरकडे टी२० संघाची धुरा असेल. त्याचवेळी विश्वचषक स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केलेल्या वेदा कृष्णमूर्ती हिला मात्र संघाबाहेर काढण्यात आले असून नागपूरच्या मोना मेश्रामला एकदिवसीय संघात पुन्हा स्थान मिळाले आहे. भारतीय संघ २४ जानेवारीपासून न्यूझीलंड दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी२० सामने खेळेल.
मागच्या महिन्यात टी२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पराभूत झाल्यापासून भारतीय महिलांचा हा पहिला दौरा असेल. डब्ल्यू. व्ही. रमण यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केल्यानंतर संघाची घोषणा करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेचे माजी दिग्गज गॅरी कर्स्टन हे देखील प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत पुढे होते, पण आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुचे प्रशिक्षकपद सोडण्यास ते तयार नव्हते. बीसीसीआयने ३० नोव्हेंबर रोजी रमेश पोवार यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नव्याने अर्ज मागविले होते.
कर्णधार मिताली राजने शुक्रवारी निवड समितीच्या बैठकीत भाग घेतला, तर आॅस्ट्रेलियाच्या बिग बॅशमध्ये खेळत असलेल्या हरमनप्रीतने स्कायपी व्हिडिओद्वारे भाग घेतला. निवड समिती प्रमुख हेमलता काला, बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी आणि काळजीवाहू सचिव अमिताभ चौधरी यांनी यावेळी संघात निवड झालेल्या खेळाडूंची नावे जाहीर
केली. अनुभवी खेळाडू वेदा कृष्णमुर्तीऐवजी मोना मेश्राम हिला भारताच्या एकदिवसीय संघात निवडण्यात आले. त्याचवेळी, शिखा पांडे हिने जखमी पूजा वस्त्रकारऐवजी टी२० संघात स्थान पटकविले आहे. (वृत्तसंस्था)
भारतीय महिला एकदिवसीय संघ : मिताली राज (कर्णधार), पूनम राऊत,, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज,हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, तान्या भाटिया, मोना मेश्राम, एकता बिश्त, मानसी जोशी, डायलान हेमलता, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी आणि शिखा पांडे.
टी२० संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, मिताली राज, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, अनुजा पाटील, दयालन हेमलता, मानसी जोशी, शिखा पांडे, तानिया भाटिया, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव, अरुंधती रेड्डी आणि प्रिया पुनिया.