Join us

ही दोस्ती तुटायची नाय; गांगुलीनं केला खुलासा अन् त्याला तेंडुलकरचा रिप्लाय 

सोशल मीडियावर तेंडुलकर-गांगुली अशा वादाचे चित्र रंगवले जाऊ लागले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2019 21:26 IST

Open in App

मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी वर्ल्ड कपमध्ये खेळू नये अशी भावना व्यक्त केली जात आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हा चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात टाकला आहे. मात्र, महान फलंदाज सचिन तेंडुलकरने, भारतीय संघाने वर्ल्ड कपमध्ये सामना खेळून पाकिस्तानला पराभूत करावे. उगाच त्यांना दोन गुण देऊ नये, असे मत व्यक्त केले होते. तेंडुलकरच्या या विधानावर माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही प्रतिक्रीया दिली आहे. गांगुलीच्या या विधानामुळे सोशल मीडियावर तेंडुलकर-गांगुली अशा वादाचे चित्र रंगवले जाऊ लागले. त्यामुळे गांगुलीनं त्यावर खुलासा केला.

सचिन म्हणाला होता की, " भारताने नेहमीच पाकिस्तानविरुद्ध चांगलीच कामगिरी केली आहे. आता पुन्हा एकदा त्यांना मैदानात पराभूत करायला हवे. जर पाकिस्तानबरोबर आपण खेळलो नाही तर आपल्याकडून त्यांना दोन गुण बहाल होतील. त्यामुळे मला तरी असे वाटते की आपण पाकिस्तानला दोन गुण देऊ नये. पण माझ्यासाठी देश जो निर्णय घेईल तोच योग्य असेल." 

या विधानावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. पण, तेंडुलकरच्या या विधानावर गांगुली म्हणाला,'' तेंडुलकरला दोन गुण हवे आहेत, पण मला वर्ल्ड कप हवा आहे. याकडे तुम्हाला हव्या त्या नजरेनं पाहा.'' पण, आपल्या या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचं स्पष्टीकरण गांगुलीनं दिलं. तो म्हणाला,''मला वर्ल्ड कप हवा आहे. माझे हे विधान तेंडुलकरच्या विधानाला विरोध दर्शवणारे नव्हते किंवा त्याच्या विधानावर दिलेले नव्हते. मागील 25 वर्षांपासून तो माझा चांगला मित्र आहे आणि यापुढेही राहिल.'' तेंडुलकरनेही 'दादा'च्या या ट्विटवर प्रतिक्रीया दिली. तो म्हणाला, तुला कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही. आपल्या देशासाठी काय सर्वोत्तम आहे, याची आपल्याला जाण आहे.'' 

टॅग्स :सचिन तेंडुलकरसौरभ गांगुलीपुलवामा दहशतवादी हल्ला