अहमदाबाद : वनडे क्रिकेटमध्ये अनेकांनी शतके ठोकली, पण द्विशतके फार कमी फलंदाजांच्या वाट्याला आली. ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये द्विशतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत उत्तराखंडची महिला क्रिकेटपटू नीलम भारद्वाज हिचाही समावेश झाला. अहमदाबाद येथे सीनियर वुमन्स वनडे ट्रॉफी स्पर्धेत उत्तराखंडकडून खेळणारी १८ वर्षीय नीलमने नागालँडविरुद्ध मंगळवारी शानदार द्विशतक झळकावत विक्रमी कामगिरी केली.
द्विशतक ठोकणारी ती सर्वात युवा भारतीय
तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला आलेल्या नीलमने १३७ चेंडूंत नाबाद २०२ धावा केल्या. तिने २७ चौकार आणि दोन षटकार मारले. हे तिचे पहिलेच द्विशतक आहे. लिस्ट अ क्रिकेट सामन्यात द्विशतक ठोकणारी ती सर्वात युवा भारतीय खेळाडू ठरली, शिवाय लिस्ट अ क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारी दुसरीच खेळाडू ठरली आहे. यापूर्वी श्वेता सेहरावत हिने याच वर्षाच्या सुरुवातीला १९व्या वर्षी दिल्लीकडून नागालँडविरुद्धच द्विशतक ठोकले होते. तिने १५० चेंडूंत २४२ धावा केल्या होत्या. नीलमने केलेल्या द्विशतकाच्या जोरावर उत्तराखंडने ५० षटकांत २ बाद ३७१ धावा केल्या. नागालँडचा संघ ४७ षटकांत ११२ धावांवरच बाद झाला.
हलाखीच्या परिस्थितीतून आलेल्या लेकीनं दाखवून दिली धमक
रेल्वे स्टेशन भागातील झोपडपट्टीमध्ये नीलम लहानाची मोठी झाली. तिचे वडील रोजंदारी मजूर होते. २०२० मध्ये प्लाय कारखान्यातील एका अपघातात त्यांचे निधन झाले. क्रिकबझच्या वृत्तानुसार मोहम्मद इस्रार अन्सारी यांनी नीलमच्या क्रिकेटसाठी खर्चाची जबाबदारी घेतली. नीलमने हळूहळू क्रिकेटमध्ये प्रगती करीत उत्तराखंडच्या महिला संघात स्थान मिळविले आहे. तिने कामगिरीने सर्वांचे लक्षही वेधले.