Join us

क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल

Netherlands Vs Nepal T20: स्कॉटलंड, नेदरलँड आणि नेपाळ यांच्यात सुरू असलेल्या टी-२० तिरंगी मालिकेत काल नेदरलँड आणि नेपाळ यांच्यात झालेल्या टी-२० लढतील याचाच प्रत्यय आला. कमालीचा रोमांचक झालेला हा सामना चक्क तीन वेळा तीन वेळा टाय झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 09:57 IST

Open in App

क्रिकेटच्या मैदानात नेहमीच नवनवे विक्रम घडत असतात. तर जुने विक्रम तुटत असतात. अनिश्चिततेचा खेळ असा लौकीक असलेल्या क्रिकेटमध्ये अखेरचा चेंडू टाकला जाईपर्यंत कधी काय होईल आणि कोण बाजी मारून जाईल हे छातीठोकपणे सांगता येत नाही. सध्या  स्कॉटलंड, नेदरलँड आणि नेपाळ यांच्यात सुरू असलेल्या टी-२० तिरंगी मालिकेत काल नेदरलँड आणि नेपाळ यांच्यात झालेल्या टी-२० लढतील याचाच प्रत्यय आला. कमालीचा रोमांचक झालेला हा सामना चक्क तीन वेळा तीन वेळा टाय झाला. अखेर या लढतीचा निकाल तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये लागला आणि त्यात नेदरलँडने बाजी मारली.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासात एखाद्या लढतीत तीन वेळा सुपर ओव्हर खेळवली जाण्याची ही पहिलीच वेळ ठरली. या लढतीत  नेदरलँडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ७ बाद १५२ धावा फटकावल्या. त्यानंतर या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळला ८ बाद १५२ धावांपर्यंतच मजल मारता आली. नेपाळला अखेरच्या षटकात विजयासाठी १६ धावांची गरज होती. नेदरलँडचा वेगवान गोलंदाज क्लाईल क्लेन याने टाकलेल्या अखेरच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर संदीप लामिछाने याने २ आणि १ अशा मिळून ३ धावा काढल्या. त्यानंतर स्ट्राईकवर आलेल्या नंदन यादव याने अखेरच्या ४ चेंडून ४,२,२,४ अशा मिळून १२ धावा काढल्या. त्यामुळे नेपाळला विजयासाठी १ धाव कमी पडली आणि ही लढत टाय झाली.

त्यानंतर खेळवण्यात आलेल्या पहिल्या सुपर ओव्हरमध्ये नेपाळने प्रथम फलंदाजी करताना कुशल भुर्टेलने २ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर १९ धावा कुटल्या. त्यानंतर पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत मायकल लेविट याने नेदलँडला आक्रमक सुरुवात करून दिली. तर अखेरच्या दोन चेंडूंवर ६ आणि ४ अशा दहा धावा कुटत मॅक्स ओडॉडने नेदरलँडची धावसंख्या १९ वर पोहोचवत सामना टाय करण्यात यश मिळवलं. 

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये नेदरलँडने प्रथम फलंदाजी करताना १७ धावा फटकावल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर षटकाक ठोकत रोहित पौडेल याने नेपाळला चांगली सुरुवात करून दिली. सुपर ओव्हरमधील अखेरच्या चेंडूवर नेपाळला ७ धावांची गरज होती. तेव्हा दीपेंद्र सिंह ऐरी याने षटकार ठोकत दुसरी सुपर ओव्हरदेखील टाय करण्यात यश मिळवलं.

त्यानंतर झालेल्या तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मात्र नेपाळच्या फलंदाजांनी निराशा केली. त्यांना या सुपरओव्हरमध्ये एकही धाव काढता आली नाही. नेदरलँडचा गोलंदाज जॅक लायन-कॅचेट याने नेपाळच्या रोहित पोडेल आणि रूपेश सिंह यांना बाद करत नेपाळचा डाव गुंडाळला. त्यानंतर नेदरलँडचा फलंदाज लेविट याने संदीप लामिछाने याला उत्तुंग षटकार ठोकत अखेर नेदरलँडला विजय मिळवून दिला.  

टॅग्स :टी-20 क्रिकेटआंतरराष्ट्रीय क्रिकेटनेपाळ