IND vs ENG 2nd Test Day 4 Stumps : ज्या बर्मिंगहॅमच्या मैदानात आतापर्यंत एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही तिथं टीम इंडियाने आपला रुबाब दाखवून दिलाय. चौथ्या दिवशी भारतीय संघाने ६०८ धावांचे टार्गेट दिल्यावर इंग्लंडच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना स्वस्तात तंबूत धाडले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी इंग्लंडचा संघाने अवघ्या ७२ धावांवर ३ विकेट्स गमावल्या होत्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाचव्या आणि अखेरच्या दिवशी इंग्लंडच्या संघाला ५३६ धावांची आवश्यकता असून टीम इंडियाला इंग्लंडचा बालेकिल्ला जिंकण्यासाठी ७ विकेट्स मिळवायच्या आहेत. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत इंग्लंडचा करेक्ट कार्यक्रम करण्याची एक उत्तम संधी टीम इंडियाकडे आहे. हा डाव साधत टीम इंडिया अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी सुुरु असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत यजमानांची बरोबरी करेल, असे चित्र दुसऱ्या कसोटीतील चार दिवसाच्या खेळानंतर निर्माण झाले आहे.
आतापर्यंत ७ सामन्यात या मैदानात एक विजय नाही मिळाला
भारतीय संघानं १९६७ मध्ये इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टनच्या मैदानात पहिला कसोटी सामना खेळला होता. तेव्हापासून आतापर्यंत सात सामन्यात टीम इंडियाला एकदाही या मैदानात विजय मिळवता आलेला नाही. १९९६ मध्ये भारतीय संघाने या मैदानातील एक सामना अनिर्णित राखला होता. पण आता शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली इथं पहिला विजय दृष्टिक्षेपात दिसत आहे.
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
पाचव्या अन् अखेरच्या दिवशी या तिघांना लवकर तंबूत धाडण्याचं असेल चॅलेंज
१९९६ मध्ये जे टीम इंडियानं केलं ते यावेळी इंग्लंडनं करू नये, अशीच भारतीय क्रिकेट संघासह प्रत्येक चाहत्यांची इच्छा असेल. इंग्लंडचा संघ जिंकणार नाही ते पक्के आहे, पण पाचव्या दिवशी सामना अनिर्णित ठेवण्याचा त्यांचा डाव यशस्वी होणार नाही यासाठी टीम इंडियातील गोलंदाजांना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत लवकरात लवकर विकेट्स घेण्यावर भर द्यावा लागेल. हॅरी ब्रूक अन् ओली पोप या दोघांनी टीम इंडियाविरुद्ध चांगली कामगिरी केलीय. जेमी स्मिथ हा देखील टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकतो. या तीन विकेट्स टीम इंडियासाठी सर्वात महत्त्वपूर्ण असतील.