T20 World Cup Team India : टी २० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाला सेमीफायनलमध्येही प्रवेश मिळवता आला नाही. भारतीय संघाच्या कामगिरीवर अनेक स्तरातून टीका होत आहे. परंतु दुसरीकडे इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसैन यांनी भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक का झाली यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) स्पर्धांमध्ये भारताचे निर्भयपणे न खेळणं, पर्यायी योजनेचा अभाव आणि निवड समस्या ही टीम टी-२० विश्वचषकातून लवकर बाहेर पडण्याची प्रमुख कारणं होती, असं इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसैन यांनी व्यक्त केलं.
विश्वचषकातील पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरोधातील पहिल्या दोन सामन्यात भारताला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. दोन पराभवांमुळे भारतीय संघाला सेमीफायनलमध्येही प्रवेश मिळाला नाही. "तुम्हाला मैदानावर येऊन उत्तम खेळ खेळायचा आहे. भारताकडे टॅलेंटची कमतरता नाही. तीच एक गोष्ट असू शकते ज्यामुळे भारत आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पुढे जाऊ शकत नाही," असं हुसैन टी २० वर्ल्ड कप डॉट कॉमशी बोलताना म्हणाले.
"भारताने ज्या प्रकारे निर्भयपणे खेळले पाहिजे, तसे ते क्रिकेट खेळत नाहीत कारण ते खूप प्रतिभावान आहेत. भारताला सलामीच्या सामन्यात पाकिस्तानकडून १० गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. पुढच्या सामन्यात त्यांना न्यूझीलंडकडून आठ गडी राखून पराभव पत्करावा लागला. रविवारी न्यूझीलंडने अफगाणिस्तानवर मिळवलेल्या विजयामुळे भारत सेमीफानलच्या शर्यतीतून बाहेर पडला," असंही ते म्हणाले.
विश्वचषकाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक भारताला मी मानलं होतं. ते इथेच आयपीएल सामने खेळले आणि त्यांच्या संघात अनेक स्टार खेळाडू आहेत. शाहीन आफ्रिदीनं ज्या प्रकारे पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी केली त्यामुळे भारताला पहिल्याच सामन्यात मोठा झटका लागला. ज्या चेंडूंवर रोहित शर्मा, केएल राहुल बाद झाले त्या चेंडूवर अनेक दिग्गज फलंदाजही बाद होऊ शकले असते," असंही हुसैन यांनी नमूद केलं.
मीडल ऑर्डर प्लेअर्सना संधी नाही"कधी कधी भारतीय संघासोबत अशी समस्या होते की त्यांच्या टॉप ऑर्डरमध्ये इतके चांगले फलंदाज आहेत की त्यांच्या मीडल ऑर्डरमधील फलंदाजांना अधिक संधीच मिळत नाही. अचानक त्यांना ऑप्शनलयोजनेची गरज पडल्यावर ती उपलब्ध नसते. हार्दिक पांड्याला केवळ फलंदाजाच्या रूपात उतरवण्याच्या निर्णयानं टीमचं संतुलन प्रभावित झालं. परंतु कधी कधी निवडीनुसार हार्दिक पांड्यासारख्या खेळाडूचं फलंदाजाच्या रूपात खेळणं टीमचं संतुलन बदलतं. न्यूझीलंडच्या विरोधात रोहित आणि राहुल यांच्याद्वारे फलंदाजी सुरूवात न करणं हा योग्य निर्णय नव्हता," असंही ते म्हणाले.