नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांनी एकजुट दाखवली असून त्यांच्या आघाडीला 'इंडिया' असे नाव देण्यात आले आहे. आता इंडिया या नावावरून चांगलेच राजकारण तापल्याचे दिसते. देशाचे नाव इंडिया नसून भारत असे होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर राजकीय नेतेमंडळी देखील आपापली प्रतिक्रिया देत असून विरोधक भाजपावर टीका करत आहेत. अशातच भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने भारत हे नाव बरोबर असल्याचे म्हटले आहे.
देशाच्या नावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली असताना सेहवागने सोशल मीडियावर एक पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधले. त्याने सांगितले की, मला नेहमीच वाटते की, आपल्यामध्ये अभिमान जागृत करणारे नाव असावे. आम्ही भारतीय आहोत, इंडिया हे ब्रिटीशांनी दिलेले नाव आहे आणि आमचे मूळ नाव 'भारत' आहे. हे नाव अधिकृतरीत्या परत मिळण्यास बराच काळ लोटला आहे. त्यामुळे मी बीसीसीआय आणि जय शाह यांना आग्रह करतो की, आगामी विश्वचषकात आमच्या खेळाडूंच्या छातीवर अर्थात जर्सीवर 'भारत' असेल याची खात्री करावी.
५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर झाला. कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेत भारताचा संघ जाहीर केला.
विश्वचषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
विश्वचषकातील भारताचे सामने -
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ८ ऑक्टोबर, चेन्नई
भारत विरुद्ध अफगाणिस्तान - ११ ऑक्टोबर, दिल्ली
भारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौ
भारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू