क्रिकेटमध्ये आतापर्यंत कच्चा लिंबू समजल्या जाणाऱ्या नवख्या नामिबियाच्या संघाने आज सनसनाटी निकालाची नोंद केली आहे. आज शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक टी-२० लढतीत नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेवर ४ गडी राखून विजय मिळवला. शेवटच्या चेंडूवर नामिबियाला विजयासाठी एका धावेची गरज असताना नामिबियाच्या झेन ग्रीन याने खणखणीत चौकार ठोकत संघाला एक अविस्मरणीय विजय मिळवून दिला.
नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांमध्ये आज विंडहोक येथे एकमेव टी-२० सामना खेळा गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी ठेवलेल्या १३५ धावांच्या आव्हानाचा नामिबियाने नाट्यमयरीत्या यशस्वी पाठलाग केला. दक्षिण आफ्रिकन गोलंजदाजांच्या भेदक माऱ्यासमोर नामिबियाचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होते. त्यामुळे एकवेळ त्यांची अवस्था सतराव्या षटकात ६ बाद १०१ अशी झाली होती. मात्र शेवटच्या २१ चेंडूत ३४ धावांची गरज असताना झेन ग्रीन (नाबाद ३०) आणि रुबेन ट्रंपलमेन (११) यांनी टिच्चून फलंदाजी करत नामिबियाला विजयासमीप पोहोचवले. अखेरीस शेवटच्या षटकात ११ धावा आवश्यक असताना ग्रीनने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. त्यानंतर एकेक धाव घेत पाचव्या चेंडूवर सामना बरोबरीत आणला. मग शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत नामिबियाच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.
या सामन्यात पाहुणे दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सामन्याच्या सुरुवातीपासूनच यजमान नामिबियाचा संघ दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व राखताना दिसून आला. नामिबियाच्या रुबेन ट्रंपलमेन आणि मॅक्स हेंगो यांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव सुरुवातीपासूनच अडखळला. अनुभवी क्विंटन डी कॉक केवळ १ धाव काढून बाद झाला. त्यानंतर आफ्रिकेच्या इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता न आल्याने तेराव्या षटकात त्यांची स्थिती ६ बाद ८२ अशी झाली होती. त्यानंतर तळाच्या ब्यॉर्न फॉर्च्युन (नाबाद १९) आणि गेराल्ड कोर्ट्झे यांनी सावध खेळत दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत १३४ धावांपर्यंत मजल मारून दिली होती.