आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या रोमांचक सामन्यात भारताला तीन विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना भारताने २५१ धावांचे आव्हान दिले होते, परंतु, दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार लॉरा वोल्वार्ड आणि खालच्या फळीतील फलंदाज नॅडिन डी क्लार्क यांनी केलेल्या अप्रतिम खेळीमुळे भारताचा पराभव झाला.
दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली होती. तंजामीन ब्रिट्स (० धाव) आणि सून लुस (५ धावा) लवकर बाद झाल्या. एका वेळी, आफ्रिकेच्या संघाने फक्त ८१ धावांत पाच विकेट्स गमावल्या होत्या आणि भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती. मात्र, त्यानंतर कर्णधार लॉरा वोल्वार्ड (१११ चेंडूंत ७० धावा) आणि त्यानंतर आलेल्या नॅडिन डी क्लार्क यांनी सामन्याचे चित्र पालटले. नॅडिन डी क्लार्कने अवघ्या ५४ चेंडूंत ८४ धावांची धडाकेबाज, नाबाद खेळी केली. या खेळीत आठ चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. नॅडिन शेवटपर्यंत मैदानावर टिकून राहिली आणि आफ्रिकेला अविश्वसनीय विजय मिळवून दिला.
आफ्रिकेने मोडला इंग्लंडचा विक्रम
हा विजय दक्षिण आफ्रिकेसाठी ऐतिहासिक ठरला. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच विकेट गमावल्यानंतर सर्वाधिक धावा करून सामना जिंकणारा आफ्रिकन संघ जगातील पहिला संघ बनला आहे. भारताविरुद्धच्या या सामन्यात पाच विकेट गमावल्यानंतर त्यांनी एकूण १७१ धावा केल्या. यापूर्वी, इंग्लंडच्या महिला संघाने २०१९ मध्ये भारताविरुद्ध पाच विकेट गमावल्यानंतर १५९ धावा केल्याचा विक्रम होता, जो आफ्रिकेने मोडला
भारतासमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान
विश्वचषक २०२५ मधील भारतीय महिला संघाचा हा पहिला पराभव आहे. भारताने आतापर्यंत तीन सामने खेळले असून यातील दोन जिंकले आहेत आणि एका सामन्यात त्यांचा पराभव झाला.भारतीय संघाचा नेट रन रेट अजूनही चांगला (प्लस ०.९५३) आहे. मात्र, पुढील आव्हान अधिक कठीण असणार आहे. टीम इंडियाचा पुढील सामना १२ ऑक्टोबर रोजी बलाढ्य ऑस्ट्रेलियन महिला संघाविरुद्ध होणार आहे.