लंडन : इंग्लंड दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघातून अखेरच्या दोन कसोटीत वगळलेल्या मुरली विजयला सूर गवसला. इंग्लिश खेळपट्टीवर धावा करण्यात चाचपडणाऱ्या विजयने कौंटी क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावले. कौंटी चॅम्पियनशिपमध्ये एसेक्स क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व करताना विजयने नॉटिंगहॅमशर क्लबविरुद्ध ही शतकी खेळी केली. तत्पूर्वी पहिल्या डावात त्याने ९५ चेंडूंत ५६ धावांची उपयुक्त खेळी केली होती.
विजयने पहिल्या डावात कर्णधार स्टीव्हन मुलानीसह १०८ धावांची भागीदारी केली होती. त्यात त्याचा ५६ धावांचा वाटा होता. २८२ धावांचा पाठलाग करताना एसेक्सला अवघ्या ११ धावावर पहिला धक्का बसला. त्यानंतर विजय आणि टॉम वेस्टली यांनी १९९ धावांची भागीदारी करताना एसेक्सला विजय मिळवून दिली. विजयने १८१ चेंडूत १५ चौकारांसह १०० धावा केल्या.
या शतकाबरोबर एसेक्सकडून २००९ नंतर पदार्पणात शतक करणारा तो पहिला खेळाडू ठरला. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाने २००९ ला पदार्पणात शतक केले होते. त्याशिवाय पदार्पणात शतक करणाराअ विजय हा दुसरा
भारतीय आहे. २००९ मध्ये पियुष चावलाने ससेक्स क्लबकडून शतक झळकावले होते.