Join us  

भारताला आशिया कप जिंकवून देणाऱ्या मुंबईकर अथर्वला आई देणार खास गिफ्ट!

भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाने शनिवारी थरारक सामन्यात बांगलादेशला नमवून सातव्यांदा आशिया चषक नावावर केला.

By स्वदेश घाणेकर | Published: September 14, 2019 5:16 PM

Open in App

- स्वदेश घाणेकरमुंबई : भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाने शनिवारी थरारक सामन्यात बांगलादेशला नमवून सातव्यांदा आशिया चषक नावावर केला. 106 धावांचे माफल लक्ष्य बांगलादेश सहज पार करेल असे दिसत होते, परंतु मुंबईकर अथर्व अंकोलेकरने टीम इंडियाला थरराक विजय मिळवून दिला. बांगलादेशला विजयासाठी 8 धावांची आवश्यकता असताना टीम इंडियाच्या कर्णधाराने चेंडू अथर्वच्या हाती दिला. 33 व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूवर दोन धावा निघाल्यानंतर बांगलादेश सहज जिंकेल अशी सर्वांना खात्री पटली होती. पण, अथर्वनं बांगलादेशच्या तोंडचा घास हिसकावला. त्यानं त्या षटकात दोन विकेट घेत भारताला 5 धावांनी विजय मिळवून दिला. हा सर्व थरार मुंबईत त्याची आई वैदेही अंकोलेकरही अनुभवत होती आणि मुलाच्या या दैदिप्यमान कामगिरीनं तिच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळले. 

अथर्वचे वडील विनोद अंकोलेकर बेस्टमध्ये कंडक्टर होते. 2010 साली त्यांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर अथर्वला क्रिकेटसाठी आईनेच प्रोत्साहन दिले. वैदही या मरोळ बेस्ट आगारामध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पाच विकेट घेऊन सामनावीर ठरलेल्या अथर्वला त्यांनी खास गिफ्ट देण्याचा प्लान केला आहे. 
त्यांनी सांगितले की,''खूप आनंदी आहे. त्याने आज वडिलांचे स्वप्न पूर्ण केलं. भारताकडून चांगलं खेळण्याचं त्यानं वडिलांना वचन दिलं होतं. हा सामना पाहताना माझ्यावरही प्रचंड दडपण होते. मी कामावर असताना अॅपवर मॅचचे अपडेट्स पाहत होते. अथर्व दोन धावांवर माघारी परतल्यानंतर मला खूप टेंशन आलं होतं. माझी एक फेरी बाकी होती, परंतु वरिष्ठांची परवानगी घेऊन मी घरी परतले आणि मॅच लावून टीव्हीसमोर बसले. मी घरी आले तेव्हा त्याची गोलंदाजी सुरू झाली नव्हती. मी सतत देवाचे नामस्मरण करत होते.''

अथर्वचे वडील विनोद हे स्वत: उत्कृष्ट क्रिकेट खेळायचे. मात्र त्यांना क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवलेल्या अथर्वने वयाच्या 9व्या वर्षी वडिलांचे छत्र गमावले.

वैदेही म्हणाल्या,''बांगलादेशला विजयासाठी 7 धावा आवश्यक असताना पहिल्याच चेंडूवर एक धाव निघाली. तेव्हा टीम इंडिया हरेल असे वाटले होते. पण, अथर्वने जिद्द सोडली नाही. त्यानं स्वतःला सिद्ध केलं. उद्या आल्यावर सेलिब्रेशन करू. त्याला नॉन वेज जास्त आवडतं. त्यामुळे मायदेशात आल्यावर त्याच्या आवडीचं नॉन व्हेज जेवणाची जंगी पार्टी करू."

   

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतबांगलादेश