ठळक मुद्देपृथ्वीने 74 चेंडूत 18 चौकार आणि 1 षटकार खेचत नाबाद 101 धावा केल्या.
बेकेनहॅम - मुंबईचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉची बॅट सध्या चांगलीच तळपत आहे. इंग्लंड दौ-यावर वेस्ट इंडिज अ संघाविरूद्धच्या अनधिकृत कसोटीत भारत अ संघाच्या मदतीला शॉ धावला आहे. भारतीय संघाचा पहिला डाव 133 धावांवर संपुष्टात आणून वेस्ट इंडिजने 383 धावांचा डोंगर उभा केला. 250 धावांनी पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाला शॉने दमदार फटकेबाजी करून आघाडीचा मार्ग दाखवला.
पहिल्या डावात शॉला भोपळाही फोडता आला नव्हता. मात्र दुस-या डावात शॉने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने 74 चेंडूत 18 चौकार आणि 1 षटकार खेचत नाबाद 101 धावा केल्या. त्याला मयांक अगरवालने नाबाद 56 धावा करून त्याला योग्य साथ दिली. या दोघांच्या फटकेबाजाच्या जोरावर भारत अ संघाने दुस-या दिवसअखेर बिनबाद 159 धावा केल्या आहेत. भारत अजूनही 91 धावांनी पिछाडीवर आहे.