Mumbai Team, Ranji Trophy Knockout : मुंबईने भारतीय क्रिकेटला अनेक कर्णधार दिले. यातील बरेचसे कर्णधार अजूनही क्रिकेट खेळत आहेत. यंदा मुंबईच्या रणजी संघात अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर हे आजी माजी कर्णधार खेळले आहेत. त्यानंतर आता भारताचा आणखी एक कर्णधार मुंबईच्या रणजी संघातून खेळताना दिसणार आहे. हरयाणा विरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यासाठी मुंबईच्या १८ सदस्यीय संघात भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि शिवम दुबे (Shivam Dube) यांचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई आणि हरयाणा यांच्यात बाद फेरीचा सामना ८ फेब्रुवारीपासून होणार आहे. यासाठी सूर्याची खास निवड करण्यात आली आहे.
मेघालयला हरवून मुंबई बाद फेरीत
मेघालयला एक डाव आणि ४५६ धावांनी हरवून मुंबईने रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. जम्मू काश्मीर हा एलिट ग्रुप-अ मधून बाद फेरीत पोहोचणारा दुसरा संघ आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्राविरुद्ध झालेल्या रणजी सामन्यात सूर्यकुमार मुंबई संघाचा भाग होता. तर शिवम दुबे नुकताच जम्मू काश्मीर विरुद्ध खेळला. या सामन्यात रोहित शर्मानेही सहभाग घेतला होता. बाद फेरीत मुंबईचा सामना ग्रुप C मधील अव्वल असलेल्या हरयाणाशी होणार आहे.
सूर्यकुमारचा बॅटिंग फॉर्म चिंताजनक
इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत सूर्यकुमारची बॅट तपळली नाही. कर्णधार म्हणून त्याची कामगिरी चांगली होती, पण फलंदाजीत तो छाप पाडू शकला नाही. पाच सामन्यांमध्ये त्याने केवळ २८ धावा केल्या. दोन सामन्यात तर तो शून्यावरही बाद झाला. आता मुंबई रणजी संघात तो काय कमाल करतो हे पाहावे लागेल.
मुंबईचा रणजी संघ
अजिंक्य रहाणे (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगक्रिश रघुवंशी, अमोघ भटकळ, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, शिवम दुबे, आकाश आनंद (यष्टिरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टिरक्षक), सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकूर, शॅम्स मुलानी, तनुश कोटियन, मोहित अवस्थी , सिल्वेस्टर डिसोझा, रॉयस्टन डायस, अथर्व अंकोलेकर, हर्ष तन्ना.