Join us  

सूर्यकुमार यादव IPL 2024 ला मुकणार? Mumbai Indians च्या फलंदाजाच्या पोस्टमुळे चर्चा

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये नवा कर्णधार हार्दिक पांड्यासह नव्या आव्हानासाठी मुंबई इंडियन्स सज्ज झाली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 4:11 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये नवा कर्णधार हार्दिक पांड्यासह नव्या आव्हानासाठी मुंबई इंडियन्स सज्ज झाली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर MI च्या खेळाडूंनी नेटमध्ये सरावही सुरू केला आहे. रोहित शर्माचे उत्तुंग फटके पाहून चाहते आनंदित झाले आहेत. इशान किशन परतला आहे, टीम डेव्हिडही दिसतोय ... पण Mr 360 सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) अजूनही दिसलेला नाही. त्यात त्याने मंगळवारी इंस्टावर तुटलेल्या हृदयाचा फोटो पोस्ट करून चाहत्यांची चिंता वाढवली आहे. दुखापतीमुळे सूर्यकुमार आयपीएल २०२४ ला मुकणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. 

हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर सूर्यकुमार अद्याप बरा झालेला नाही आणि तो जानेवारीपासून क्रिकेटपासून दूर आहे. सूर्यकुमार आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यांना मुकणार असल्याचा अहवाल समोर आला होता. पण, त्याच्या पोस्टने तो IPL 2024 च्या संपूर्ण हंगामातून बाहेर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. सूर्यकुमार बरा झालेला नाही, असा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. मुंबई इंडियन्सला आपला पहिला सामना २४ मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळायचा आहे. याआधी मुंबई इंडियन्सच्या पत्रकार परिषदेत संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी सूर्याविषयी सांगितले होते की, आम्ही सूर्याबाबत BCCIच्या अपडेटची वाट पाहत आहोत. आम्हाला वैद्यकीय संघावर पूर्ण विश्वास आहे. फिटनेसमुळे काही समस्या असू शकतात. पण हा खेळच असा आहे की त्याचा आदर केला पाहिजे. 

सूर्यकुमार यादवने आपला शेवटचा सामना १४ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. दुखापतीमुळे सूर्याकुमार डीवाय पाटील ट्वेंटी-२० चषक स्पर्धेतही सहभागी होऊ शकला नव्हता. सूर्या योग्य वेळी तंदुरुस्त झाला नाही, तर तो संघासाठी मोठा धक्का असेल. सूर्याच्या नावावर १३९ ट्वेंटी-२० सामन्यांत एकूण ३२४९ धावा आहेत. यामध्ये त्याच्या नावावर एक शतक आणि २१ अर्धशतके आहेत. सूर्यकुमार यादवला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून फिटनेस सर्टीफिकेट मिळालेलं नाही आणि त्यामुळे तो सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकण्याचे वृत्त आहे. 

मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक     

  • २४ मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, अहमदाबाद
  • २७ मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री ८ वा. पासून, हैदराबाद
  • १ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री ८ वा. पासून, मुंबई
  • ७ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी ३.३० वा.पासून, मुंबई
टॅग्स :आयपीएल २०२४सूर्यकुमार अशोक यादवमुंबई इंडियन्स