Join us

IPL 2025: आईसारखी माया..!! गालावर हात फिरवून नीता अंबानींनी काढली इशान किशनची समजूत

Nita Ambani Ishan Kishan Mumbai Indians, IPL 2025 MI vs SRH: ७ वर्ष मुंबई इंडियन्सकडून खेळणारा इशान किशन पहिल्यांदा MI विरूद्ध खेळला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 10:39 IST

Open in App

Nita Ambani Ishan Kishan Mumbai Indians, IPL 2025 MI vs SRH: स्पर्धेत गुरुवारच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादचा ४ गडी आणि ११ चेंडू राखून पराभव केला. अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन आणि ट्रेव्हिस हेड या तिघांच्या छोटेखानी खेळीमुळे हैदराबादच्या धडाकेबाज फलंदाजांना २० षटकांत १६२ धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना विल जॅक्स, रायन रिकल्टन आणि सूर्यकुमार यादव यांच्या फलंदाजीच्या जोरावर मुंबईने सामना जिंकला. अनेक वर्षे मुंबईकडून खेळणारा इशान किशन काल पहिल्यांदाच मुंबईच्या विरूद्ध खेळला. सामना संपल्यानंतर, तो नीता अंबानी यांना भेटायला आला. त्यावेळी त्यांच्यात खूप चांगला बाँड दिसून आला.

इशान किशन - नीता अंबानी यांची भेट

२०१८ पासून २०२४ च्या हंगामापर्यंत ईशान किशन हा मुंबई इंडियन्स संघाचा भाग राहिला. या फ्रँचायझी संघासोबतचे त्याचे कमालीचे बॉन्डिंगही पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सच्या संघाकडून १०५ आयपीएल सामन्यात त्याने २६४४ धावा केल्या. पण यंदा त्याला मेगालिलावात हैदराबादने विकत घेतले. पहिल्यांदाच इशान आपल्या जुन्या संघासमोर आला. बॅटने त्याला फारशी कमाल दाखवता आली नाही. २ धावांवर तो बाद झाला. त्यानंतर त्याचा संघही पराभूत झाला. त्यामुळे तो काहीसा निराश होता. त्याचवेळी मुंबई इंडियन्सच्या संघमालकीण नीता अंबानी यांना पाहून तो त्यांची भेट घ्यायला गेला. त्याने हसून त्यांना नमस्ते केलं. यावेळी पराभवाने थोडासा निराश असलेल्या इशान किशनची नीता अंबानी यांनी आपल्या मुलाप्रमाणे समजूत काढली आणि त्याला गालावर आईच्या मायेने हात फिरवत धीर दिला. याचे फोटोही व्हायरल झाले आहेत.

हैदराबादची फटकेबाजी फसली...

हैदराबादचे सलामीवीर अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड अपेक्षित फटकेबाजी करू शकले नाहीत. अभिषेकला हार्दिकने ४० धावांवर तर हेडला विल जॅक्सने २८ धावांवर बाद केले. इशान किशनही २ धावांवर विल जॅक्सचा शिकार झाला. पाठोपाठ नितीश कुमार रेड्डीही १९ धावांवर माघारी परतला. हेनरिक क्लासेनने फटकेबाजी करत ३७ धावा केल्या. अखेर अनिकेल वर्माच्या नाबाद १८ धावांच्या जोरावर हैदराबादने १६२ धावा केल्या. विल जॅक्स २ तर बोल्ट, बुमराह, पांड्या यांनी १-१ बळी टिपले.

मुंबईचा शानदार विजय

१६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून रोहित शर्माने वेगवान सुरुवात केली होती, पण २६ धावांवर तो बाद झाला. नंतर रायन रिकल्टनने ३१ तर विल जॅक्सने ३६ धावांची खेळी करत मुंबईला विजयाच्या समीप नेले. सूर्यकुमार यादवनेही २६ धावा करत मोलाचे योगदान दिले. हार्दिक पांड्याने ९ चेंडूत २१ धावा केल्या. तर तिलक वर्माने नाबाद २१ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५इशान किशननीता अंबानीमुंबई इंडियन्ससनरायझर्स हैदराबादव्हायरल फोटोज्