Mumbai Indians have signed Dhawal Kulkarni for the remaining of IPL 2022 - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात ( IPL 2022) पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians) कामगिरी अत्यंत निराशाजनक झालेली आहे. मुंबईने आतापर्यंत झालेले आठही सामने गमावले आहेत आणि त्यामुळे त्यांचे स्पर्धेच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्याची शक्यता ०.००३% इतकीच राहिली आहे. म्हणजे त्यांच्या प्ले ऑफच्या आशा या संपल्यातच जमा आहेत. चांगल्या गोलंदाजाची उणीव यंदा मुंबई इंडियन्सला प्रकर्षाने भासली. जसप्रीत बुमराहचा फॉर्मही काही खास सुरू नाहीए... त्यामुळे आता उर्वरित ६ सामन्यांसाठी मुंबई इंडियन्सने ३३ वर्षीय खेळाडूला कॉमेंट्री बॉक्समधून थेट आयपीएल २०२२च्या मैदानावर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
इंग्रजी वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई इंडियन्सने माजी सहकारी धवल कुलकर्णी ( Dhawal Kulkarni) याला उर्वरित सामन्यांसाठी करारबद्ध केले आहे आणि जर सराव सत्रात त्याची कामगिरी चांगली झाली, तर त्याला अंतिम ११मध्ये खेळवण्याचा विचार सुरू झाला आहे. IPL मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धवल कुलकर्णीने मुंबई इंडियन्सच्या बायो बबलमध्ये प्रवेश केला आहे आणि लवकरच सरावालाही सुरुवात करणार आहे. कुलकर्णी हा
आयपीएल २०२२च्या समालोचकांमध्ये होता आणि आता MI त्याला मैदानावर उतरवण्यासाठी सज्ज झाला आहे.
मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहने ८ सामन्यांत २२९ धावा दिल्या आहेत आणि फक्त पाच विकेट्स घेतल्या आहेत. अन्य गोलंदाजांचा संघर्ष सुरूच आहे. जयदेव उनाडकतने ५ सामन्यांत १९० धावा देऊन ६ विकेट्स आणि डॅनिएल सॅम्सने ५ सामन्यांत २०९ धावा देत ६ विकेट्स घेतल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या अटीतटीच्या लढतीत उनाडकतला अखेरच्या षटकात १७ धावांचा बचाव करता आला नाही. महेंद्रसिंग धोनीनं चार चेंडूत सामना फिरवला. टायमल मिल्सनेही ५ सामन्यांत १९० धावा देत ६ विकेट्स घेतल्या आहेत. बसिल थम्पीची ५ सामन्यांतील कामगिरी ५ बाद १५२ अशी झाली आहे.
रिली मेरेडिथ याला दोनच सामने खेळण्याची संधी दिली गेली आणि त्यात त्याने ६५ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. कुलकर्णीने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससह राजस्थान रॉयल्स आणि गुजरात लायन्स यांचे प्रतिनिधित्व करताना ९२ सामन्यांत ८६ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०२०च्या लिलावात मुंबई इंडियन्सने ७५ लाखांत त्याला करारबद्ध केले होते आणि २०२१मध्येही तो संघाचा भाग होता. पण, या कालावधीत त्याला एकच सामना खेळण्याची संधी मिळाली.