Mumbai Champions Of The Syed Mushtaq Ali Trophy 2024 : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघानं देशांतर्गत क्रिकेटमधील आपली बादशाहत कायम राखली आहे. इराणी चषक, रणजी करंडक स्पर्धेनंतर आता सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही मुंबईच्या संघानं बाजी मारलीये. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम सामन्यात रजत पाटीदारच्या मध्य प्रदेशच्या संघानं मुंबईसमोर १७५ धावांचे टार्गेट सेट केले होते. हे टार्गेट मुंबईच्या संघानं पाच विकेट्स राखून पार करत ट्रॉफीवर नाव कोरले. याआधी २०२२-२३ च्या हंगामात मुंबईच्या संघानं हिमाचल प्रदेशला पराभूत करत पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकली होती. देशांतर्गत टी-२० स्पर्धेत दुसऱ्यांदा मुंबईच्या संघानं या प्रतिष्ठित ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.
मध्य प्रदेशकडून कॅप्टन रजत पाटीदारनं केली नाबाद ८१ धावांची खेळी
मुंबईच्या संघानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना मध्य प्रदेशची सुरुवात खराब झाली. आघाडीची फलंदाजी कोलमडल्यावर कर्णधार रजत पाटीदार याने ४० चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकाराच्या मदतीने ८१ धावांची नाबाद खेळी करत निर्धारित २० षटकात संघाची धावसंख्या ८ बाद १७४ धावांपर्यंत पोहचवली.
पृथ्वीसह श्रेयस अय्यर स्वस्तात आटोपला, अजिंक्य सूर्यानं सावरला डाव
मध्य प्रदेशच्या संघानं सेट केलेल्या १७५ धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाची सुरुवात खराब झाली होती. धावफलकावर १५ धावा असताना मुंबईच्या संघाने पृथ्वी शॉच्या रुपात पहिली विकेट गमावली. कर्णधार श्रेयस अय्यरही संघाचं अर्धशतक होण्याआधीच तंबूत परतला. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादव यांनी छोटी पण उपयुक्त भागीदारी करत मुंबई संघाचा डाव सावरला. अजिंक्य रहाणेनं ३० चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने ३७ धावांची खेळी केली. दुसरीकडे सूर्यकुमार यादवनं ३५ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या. मुंबईकडून कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. शिवम दुबे ९ धावा काढून माघारी फिरल्यावर सूर्याही आउट झाला.
MP नं सामन्यात आणलं ट्विस्ट, पण अथर्व-सूर्यांशनं मॅच १३ चेंडू राखून संपवली
१२९ धावांवर मुंबईच्या संघाने ५ विकेट्स गमावल्यामुळे मध्य प्रदेशचा संघ सामन्यात आला. पण अथर्व अंकोलकर आणि सूर्यांश शेडगे यांनी केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे ते पुन्हा बॅकफूटवर गेले. या दोघांनी जबरदस्त फटकेबाजी करत मुंबईच्या संघाला १३ चेंडू आणि ५ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. सिक्सर मारून मॅच फिनिश करणाऱ्या अथर्वनं ६ चेंडूत २ षटकारांच्या मदतीने १६ धावांची नाबाद खेळी केली. दुसऱ्या बाजूला सूर्यांश शेडगेनं १५ चेंडूचा सामना करताना ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३६ धावांची जबरदस्त खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
Web Title: Mumbai are CHAMPIONS of the Syed Mushtaq Ali Trophy 2024 register a 5 wicket win over Madhya Pradesh In Final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.