बीसीसीआयने जून महिन्यात होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर केला. WTC Final मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया असा सामना होणार आहे. सूर्यकुमार यादवचा फॉर्म, श्रेयस अय्यरची दुखापत यामुळे BCCIला १५ सदस्यीय संघ निवडताना काही आव्हानात्मक निर्णय घ्यावे लागले. इंग्लंडमधील वातावरण अन् खेळपट्टी पाहता, बीसीसीआयने अजिंक्य रहाणेला पुनरागमनाची संधी दिली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात रिषभ पंत व जसप्रीत बुमराह हे दोन प्रमुख खेळाडू आधीच दुखापतीमुळे बाहेर गेले आहेत. यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून केएस भरत हा एकच पर्याय BCCI ने निवडला आहे.
लोकेश राहुल याचा बॅक अप यष्टिरक्षक म्हणून विचार केला जाऊ शकतो... लोकेश राहुल मधल्या फळीत खेळण्याची शक्यता अधिक आहे. पण, या संघ निवडीबाबत एक चर्चा फायनलपर्यंत रंगणार आहे. भरत की लोकेश यष्टींमागे कोण दिसेल? आता त्यात माजी कर्णधार व जगातील महान यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. ESPN Cricinfo च्या कार्यक्रमात भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांना धोनीने निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन WTC Final खेळावी, याबाबत विचारले गेले. त्यावर शास्त्री म्हणाले,''त्याने अनेक युवा यष्टिरक्षकांना यष्टिंमागे कामगिरी कशी करावी हे शिकवले आहे. ''
शास्त्री पुढे म्हणाले,''धोनी निर्णय बदलणे शक्यच नाही... एकदा त्याने ठरवलं तर ठरवलं... त्याने कसोटी क्रिकेट जेव्हा सोडलं, तेव्हा तो सहज एक-दीड वर्ष अजून खेळू शकला असता... भारतात १००वी कसोटी खेळून मोठा गाजावाजाही त्याला करता आला असता. पण, त्याला तसं नको हवं होतं. त्याने नवीन खेळाडूला संधी दिली.''
महेंद्रसिंग धोनीची कारकीर्द
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७चा ट्वेंटी-२०, २०११ चा वन डे वर्ल्ड कप जिंकला आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली. आयसीसीच्या या तिन्ही स्पर्धा जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे. त्याने ९० कसोटींत ६ शतकं व ३३ अर्धशतकांसह ४८७६ धावा केल्या आहेत. ३५० वन डे सामन्यांत त्याच्या नावावर १०७७३ धावा आणि १० शतकं व ७३ अर्धशतकं आहेत. ९८ ट्वेंटी-२०त त्याने १९१७ धावा केल्या आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"