MS Dhoni on Impact Player Rule, IPL 2025 : आयपीएलमध्ये 'इम्पॅक्ट प्लेयर'चा नियम पहिल्यांदा लागू झाला त्यावेळी दिग्गज महेंद्रसिंग धोनी फारसा आशावादी नव्हता. तथापि, धोनीच्या भूमिकेत आमूलाग्र बदल झाला. हा नियम टी-२० च्या विकासात मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास माहीने व्यक्त केला आहे. ४३ वर्षाचा धोनी स्वतःला इम्पॅक्ट प्लेयर समजत नाही. कारण, तो अद्याप आपल्या संघासाठी पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक आहे.
जियो स्टारशी बोलताना धोनी म्हणाला की, 'हा नियम पहिल्यांदा लागू झाला तेव्हा असे वाटले की, याची गरजच काय? काही मर्यादेपर्यंत मला या नियमाची मदतही झाली. मी यष्टिरक्षण करीत असल्याने इम्पॅक्ट प्लेयर नाही. या नियमानुसार पुढे जावे लागेल. अनेकांचे मत असे की, या नियमामुळे खोऱ्याने धावा निघत आहेत. माझे मत असे की, फलंदाज सहजवृत्तीने खेळत असल्याने असे घडत आहे.'
भारताचा कसोटी आणि वनडे कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांनी या नियमावर टीका केली. या दोघांचे मत असे की, यामुळे अष्टपैलू खेळाडू संकटात सापडले. अनेक संघ इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आक्रमक फलंदाजाला पसंती दर्शवितात.
या नियमामुळे संघांना कडवी स्पर्धा असेल तर एक अतिरिक्त फलंदाज ठेवण्याची संधी मिळते. हा अतिरिक्त फलंदाज ठेवल्यामुळे धावसंख्या वाढते असे मुळीच नाही. हा मानसिकतेशी जुळलेला मुद्दा आहे. सर्वच संघांकडे अतिरिक्त फलंदाजांची सोय उपलब्ध आहे. त्यामुळेच संघ अधिक आक्रमक खेळताना दिसतात.-महेंद्रसिंग धोनी