ठळक मुद्दे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी धोनीच्या कारकिर्दीबाबत केला मोठा गौप्यस्फोट २०११-१२ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब कामगिरीनंतर धोनीला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय निवड समितीने घेतला होतात्यावेळी श्रीनिवासन यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाच्या विशेष अधिकारांचा वापर करून धोनीचे कर्णधारपद वाचवले होते
नवी दिल्ली - कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर आता त्याच्या कारकिर्दीबाबतच्या चर्चांना नव्याने सुरुवात झाली आहे. दरम्यान, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी धोनीच्या कारकिर्दीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. २०११-१२ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब कामगिरीनंतर धोनीला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय निवड समितीने घेतला होता. मात्र मी त्यावेळी बीसीसीआय अध्यक्षपदाच्या विशेष अधिकारांचा वापर करून धोनीचे कर्णधारपद वाचवले होते, असा गौप्यस्फोट श्नीनिवासन यांनी केला आहे.
२०११ मध्ये विश्वचषकाला गवसणी घातल्यानंतर त्याच वर्षी झालेल्या इंग्लंड दौऱ्यात भारताला कसोटी मालिकेत ०-४ असा पराभव पत्करावा लागला होता. तर त्यानंतर झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली भारतीय संघाची कसोटी मालिकेत ०-४ असी हार झाली होती. त्यानंतर निवड समितीने धोनीला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय घेताल होता. मात्र तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांनी हस्तक्षेप केल्याने धोनीचे कर्णधारपद वाचले होते. पण या घडामोडी पडद्याआड घडल्याने त्या सर्वांसमोर आल्या नव्हत्या.
याबाबत श्रीनिवास म्हणाले की, ही ती वेळ होती जेव्हा भारताने २०११ मध्ये क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करू शकला नव्हता. अशा परिस्थितीत निवड समितीचे सदस्य धोनीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरूनही हटवू इच्छित होते. मात्र त्यांनी धोनीला पर्याय कोण असेल याचीसुद्धा चर्चा केली नव्हती. यावरून खूप चर्चा झाली. तो सुट्टीचा दिवस होता आणि मी गोल्फ खेळत होतो. मी परत आलो. त्यावेळी संजय जगदाळे बीसीसीआयचे सचिव होते. त्यांनी मला सांगितले की, सर निवड समिती कर्णधाराची निवड करण्यास नकार देत आहे. मात्र धोनी संघात असेल आणि कर्णधार म्हणून असेल, असे स्पष्टपणे सांगितले. बीसीसीआय अध्यक्ष म्हणून मी तेव्हा माझ्या अधिकारांचा वापर केला होता.
त्यावेळी मोहिंदर अमरनाथ निवड समितीमध्ये होते. तसेच धोनीच्या कप्तानीबाबत निवड समितीचे श्रीनिवासन मतभेद झाल्याचे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, या घटनेमध्ये काही पूर्वग्रह दिसत होते. धोनीने १९८३ नंतर देशाला विश्वचषक जिंकवला आणि तुम्ही सांगताय की, तो संघाचा कर्णधार असता कामा नये, असा सवाल मी निवड समितीला केला. ही गोष्ट चुकीची होती. त्यामुळे मी माझ्या मतावर ठाम राहिलो, असेही श्रीनिवासन यांनी सांगितले.
मी निवड समितीच्या बैठका पाहिल्या आहेत. त्यामध्ये धोनी जे विचार मांडायचा ते तर्कशुद्ध असायचे. त्याने कधीही पूर्वग्रह ठेवून मतप्रदर्शन केले नाही. त्यामुळेच इतरांपेक्षा त्याने आपले स्थान उंचावर नेले. व्यवसाय आणि क्रीडाक्षेत्राच्या निमित्ताने मी अनेक लोकांना भेटलोय. पण धोनीचा स्वभाव आणि समजुदारपणाशी बरोबरी करणे कुणासाठीही कठीणच आहे.