MS Dhoni Amitabh Bachchan Shah Rukh Khan, Brand Endorsements: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हे क्रिकेटमधील एक लोकप्रिय नाव आहे. काही वर्षांपूर्वी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडले असले तरी आजही त्याच्या लोकप्रियतेत कोणतीही घट झालेली नाही. उलट त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ४३ वर्षांचा धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्यातच आता त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. जाहिरातींच्या विश्वात धोनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि किंग शाहरूख खान या दोघांना मागे टाकले आहे.
![]()
धोनी बनला ब्रँड एंडोर्समेंटचा नवा 'महाराजा'
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅप्टन कूल धोनीने २०२४ च्या पहिल्या सहा महिन्यांत तब्बल ४२ ब्रँड सोबत करार केले आहेत. यासोबतच तो ब्रँड्सचे एंडोर्समेंट म्हणजे ब्रँडच्या जाहिरातींच्या संख्येत शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्याही पुढे गेला आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत ४१ ब्रँडसोबत करार केले आहेत. त्याचबरोबर शाहरुख खानने या कालावधीत ३४ ब्रँड्ससोबत करार केले आहेत.पण धोनीने या दोन्ही दिग्गजांना मागे टाकत ४२ ब्रँड्सशी करारांवर स्वाक्षरी केली आहे. झारखंडमध्ये मतदारांना जागरुक करण्यापासून ते मोठ्या ऑटोमोबाईल ब्रँडच्या जाहिराती करण्यापर्यंत धोनीचा सर्वत्र प्रभाव दिसून येतो. धोनी आता फक्त IPL मध्येच खेळत असला तरी, कंपन्या त्याच्याशी कराराद्वारे जोडले जाण्यास अजूनही उत्सुक आहेत. धोनीचा दररोजचा सरासरी स्क्रीन टाइम इतर स्टार्सच्या तुलनेत थोडा कमी आहे, परंतु त्याची ब्रँड व्हॅल्यू सतत वाढतच जात आहे.
![]()
आगामी आयपीएलमध्ये धोनी खेळताना दिसणार
धोनी आगामी हंगामात अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्जने त्याला ४ कोटी रुपये मानधनावर कायम ठेवले आहे. बीसीसीआयने आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावासाठी जुना नियम पुन्हा लागू केला होता, ज्याच्या अंतर्गत कोणत्याही खेळाडूने गेल्या ५ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल किंवा सलग ५ वर्षे कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळत असेल नसेल, किंवा तो प्लेइंग 11 चा भाग नसेल तर त्याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवता येईल. या नियमानुसार धोनी अनकॅप्ड खेळाडू बनला आहे. कारण त्याने ऑगस्ट २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडले. तसेच जून २०१९ नंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही.
Web Title: MS Dhoni overtakes Shah Rukh Khan and Amitabh Bachchan in brand endorsements with 42 brands
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.