Join us

धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा

MS Dhoni, IPL 2024 GT vs CSK: जेव्हा सामन्यानंतर धोनीला एका पुरस्काराठी बोलवण्यात आले तेव्हा तो पुरस्कार घेण्यासाठी आला नाही. धोनीच्या जागी CSKचा नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडने हा पुरस्कार स्वीकारला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 16:49 IST

Open in App

MS Dhoni, IPL 2024 GT vs CSK: चेन्नई सुपर किंग्जचा सामना शुक्रवारी गुजरात टायटन्सशी झाला. हा सामना अहमदाबादमध्ये खेळला गेला. सामन्यात यजमान गुजरातने धावांचा डोंगर उभा केला आणि सीएसकेला हे आव्हान पेलता आले नाही. गुजरात टायटन्सकडून 35 धावांनी पराभव झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल चर्चा रंगली आहे. कारण जेव्हा सामन्यानंतर धोनीला एका पुरस्काराठी बोलवण्यात आले तेव्हा तो पुरस्कार घेण्यासाठी धोनी आला नाही. धोनीच्या जागी CSKचा नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडने हा पुरस्कार स्वीकारला.

धोनी पुरस्कार घ्यायला का आला नाही? चर्चांना उधाण

चेन्नईला सामना जिंकता आला नाही. पण, CSK चाहत्यांसाठी चांगली गोष्ट म्हणजे त्यांना धोनीची फलंदाजी पाहण्याची संधी मिळाली. धोनी शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने केवळ 11 चेंडूत 26 धावा केल्या. धोनीने 236.36 च्या स्ट्राईक रेटने खेळलेल्या इनिंगमध्ये 1 चौकार आणि 3 षटकार मारले. धोनीचा स्ट्राईक रेट केवळ त्याच्याच नव्हे तर दोन्ही संघांच्या फलंदाजांमध्येही सर्वोच्च होता, ज्यामुळे त्याला सामन्याच्या शेवटी इलेक्ट्रिक स्ट्रायकर पुरस्काराचा विजेता निवडण्यात आले. धोनीला पुरस्कार मिळाला पण तो घेण्यासाठी ऋतुराज गायकवाड आला. यानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न आले. धोनी पुरस्कार घेण्यासाठी का आला नाही? याची चर्चाही सोशल मीडियावर दिसली. धोनीला पुरस्कार मिळाला असेल आणि तो स्वीकारायला आला नसेल, असे क्वचितच घडते. त्यामुळे या गोष्टीचा संबंध धोनीच्या दुखापतीशी संबंधित असू शकतो असे बोलले जात आहे.

दरम्यान, या सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 3 गडी गमावून 231 धावा केल्या. गुजरातकडून सलामीला आलेल्या शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी अप्रतिम शतकी खेळी खेळली. या दोघांनी सलामीच्या विकेटसाठी 210 धावांची विक्रमी भागीदारी केली. गिलने 55 चेंडूत 104 धावा केल्या तर साई सुदर्शनने 51 चेंडूत 103 धावा केल्या. प्रत्युत्तरात सीएसकेने 232 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 20 षटकांत 8 बाद 196 धावा केल्या.

टॅग्स :आयपीएल २०२४सोशल मीडियामहेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सगुजरात टायटन्स