MS Dhoni Income Tax: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) केवळ खेळाच्या क्षेत्रातच नाही तर पैशाच्या बाबतीतही सर्वोत्तम फिनिशर आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर व्यवसायाच्या जगात यशाची नवीन इनिंग खेळत आहे. व्यवसायाच्या विस्तारामुळे त्याचे वैयक्तिक उत्पन्न सतत वाढत आहे. एमएस धोनीच्या इन्कम टॅक्स रिटर्न फायलींगमध्ये दरवर्षी चांगली वाढ होताना दिसत आहे. याची प्रचिती त्याने बरलेल्या अॅडव्हान्स इनकम टॅक्समधून येईल.
17 कोटींचा आगाऊ कर जमा
महेंद्रसिंग धोनीने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत म्हणजेच एप्रिल ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत प्राप्तिकर विभागात आगाऊ कर म्हणून 17 कोटी रुपये जमा केले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात त्याने या कालावधीसाठी आगाऊ कर म्हणून 13 कोटी रुपये भरले होते. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस त्याच्या उत्पन्नात सुमारे तीस टक्क्यांनी वाढ होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
धोनीचा गेल्या काही वर्षातील आयकर
धोनीने 2021-22 या वर्षासाठी प्राप्तिकर विभागाला 38 कोटी रुपये कर भरले होते. म्हणजेच या वर्षी त्यांचे एकूण उत्पन्न सुमारे 130 कोटी इतके होते. याआधी म्हणजेच 2020-21 मध्ये त्याने सुमारे 30 कोटींचा कर भरला होता. त्यापूर्वी 2019-20 आणि 2018-19 मध्ये 28 कोटी रुपये आयकर म्हणून भरले. 2017-18 मध्ये 12.17 कोटी रुपये आणि 2016-17 मध्ये 10.93 कोटी रुपयांचा कर भरला होता. आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द सुरू केल्यापासून धोनी झारखंडमधील वैयक्तिक श्रेणीतील सर्वात मोठा आयकर भरणारा आहे.