आयपीएल २०२६ चा थरार २८ मार्चपासून सुरू होत असून चेन्नई सुपर किंग्स आपला पहिला सामना ३० मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे. मात्र, टीम इंडियाचा स्टार फलंदाज संजू सॅमसनची चेन्नईच्या संघात एन्ट्री झाल्याने महेंद्रसिंह धोनीच्या भूमिकेबद्दल क्रिकेटविश्वात वेगळीच चर्चा रंगली आहे. या हंगामात धोनी नेमका कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार आणि त्याची रणनीती काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संजू सॅमसन आता चेन्नईच्या संघात सामील झाला आहे. संजूच्या एन्ट्रीमुळे यष्टिरक्षणाचे आणि मधल्या फळीतील समीकरण बदलले आहे. संघात संजू सॅमसन आणि उर्वील पटेल असे दोन यष्टिरक्षक पर्याय आधीच उपलब्ध असल्याने, धोनी आता केवळ इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरणार की इतर कुठल्या भूमिकेत दिसणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
गेल्या काही मोसमापासून धोनी खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत आहे. २०२५ च्या आयपीएलमध्ये तर त्याने चक्क तीन वेळा ९ व्या क्रमांकावर फलंदाजी केली. धोनीच्या आयपीएल कारकिर्दीतील बॅटिंग पोझिशननुसार कामगिरीवर नजर टाकल्यास त्याचे वर्चस्व दिसून येते. आकडेवारीनुसार, धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना एकूण ५७ सामन्यात १३७ च्या स्ट्राइक रेटने १ हजार ३६० धावा केल्या आहेत. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर (६५ सामने) १ हजार ७२२ धावा, आठव्या क्रमांकावर (१४ सामने) २३६ धावा आणि नवव्या क्रमांकावर (३ सामने) ३१ धावा केल्या आहेत.
इम्पॅक्ट प्लेयर की फिनिशर?
ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे आणि संजू सॅमसन यांच्या उपस्थितीत धोनीला वरच्या क्रमांकावर संधी मिळणे कठीण दिसत आहे. चाहत्यांची इच्छा असली तरी धोनी स्वतःला 'फिनिशर' किंवा 'इम्पॅक्ट प्लेयर' म्हणून राखून ठेवण्याची शक्यता जास्त आहे. तो कमी चेंडूत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करेल. मात्र, वाढत्या वयानुसार त्याच्या फिटनेसचीही चर्चा होत आहे.
धोनी आणि सीएसकेचे अतूट नाते
निवृत्तीच्या चर्चांवर धोनीने एकदा गंमतीने म्हटले होते की, "मी व्हीलचेअरवर असलो तरी सीएसकेचे लोक मला ओढत मैदानात आणतील." हे विधान धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील अतूट नाते स्पष्ट करते. आता ३० मार्चला राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धोनी नेमका कोणत्या रूपात दिसतो, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.