नवी दिल्ली : बीसीसीआयने टी-२० विश्वचषकातून रिकाम्या हाताने परतलेल्या टीम इंडियाच्या पुनर्बांधणीची योजना हातात घेण्याचे ठरविले आहे. या योजनेत २००७ चा विश्वचषक जिंकून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचीही भूमिका असेल. टी-२० संघाला निर्भय कौशल्य (फियरलेस स्कील) शिकविण्यासाठी बीसीसीआय धोनीची सेवा घेऊ शकेल. २०२१ ला बीसीसीआयने धोनीला टी-२० विश्वचषकादरम्यान भारतीय संघाचा ‘मेंटॉर’ म्हणून नियुक्त केले होते.
एका वृत्तानुसार बीसीसीआयचा इंग्लंडसारखा फियरलेस संघ बांधणीचा विचार आहे. याविषयी धोनीचा तज्ज्ञ सल्ला घेण्यात येईल. याविषयीचा अंतिम निर्णय लवकरच शक्य आहे.
- बीसीसीआयची भविष्यात काय योजना असेल आणि धोनीची भूमिका काय असेल, यावर मंथन सुरू झाले असून धोनीला टी-२० आणि वन डे संघाचा प्रशिक्षक किंवा संचालक नेमले जाण्याची दाट शक्यता आहे.
-टी-२० आणि वन डे असे दोन विश्वचषक जिंकून देणाऱ्या एमएसने १५ ऑगस्ट २०२० ला वन डे तसेच टी-२० प्रकारातून निवृत्ती जाहीर केली होती. त्याआधी ३० डिसेंबर २०१४ ला ऑस्ट्रेलियात अखेरचा सामना खेळून कसोटी क्रिकेटला अलविदा केले होते.
- इंग्लंडच्या धर्तीवर मर्यादित षटकांचे आणि कसोटी असे दोन वेगळे संघ तयार करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. यासाठी वेगवेगळा कोचिंग स्टाफ नेमला जाऊ शकतो. वेगळ्या प्रशिक्षकांविषयी या महिन्यात होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.