Join us
Daily Top 2Weekly Top 5

खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...

८ जून रोजी खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकूचा साखरपुडा झाला होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:31 IST

Open in App

अलीगड - समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. या दोघांच्या लग्नासाठी कुटुंबही सज्ज होते. परंतु आता या दोघांच्या लग्नाची तारीख टळल्याचे पुढे आले आहे. रिंकू आणि प्रिया यांचं नोव्हेंबर महिन्यात लग्न होणार होते परंतु ही लग्नाची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. 

८ जूनला झाला होता साखरपुडा

८ जून रोजी खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकूचा साखरपुडा झाला होता. या दोघांनी लखनौच्या एका हॉटेलमध्ये एकमेकांना अंगठी घातली. या साखरपुड्याचे बरेच फोटो, व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाले होते. ३ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर हा क्षण आल्याचं प्रिया सरोजने म्हटले होते. यावर्षी १८ नोव्हेंबरला या दोघांचे लग्न होणार होते. लग्नासाठी ठिकाणही निश्चित होते. वाराणसीच्या हॉटेल ताजमध्ये दोघे लग्नाच्या बंधनात अडकणार होते. परंतु आता हे लग्न टळले आहे. यामागे नेमकं कारण काय असा चाहत्यांना प्रश्न पडला होता त्यावर कुटुंबाने खुलासा केला.

नोव्हेंबरमध्ये होणारे लग्न क्रिकेटच्या व्यस्त शेड्युल्डमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. एकदा क्रिकेट शेड्युल्ड निश्चित झाले तर लग्नाची तारीखही ठरेल असं प्रिया सरोज यांच्या वडिलांनी सांगितले. रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचे लग्न पुढील वर्षी फेब्रुवारी अथवा मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. रिंकू सिंह घरगुती क्रिकेट सामन्यांमुळे व्यस्त आहे. क्रिकेट टुर्नामेंटमुळे लग्नासाठी त्याला वेळ नाही. त्यामुळे दोघांनी लग्न पुढे ढकलल्याचे रिंकूचे होणारे सासरे म्हणाले. पुढील वर्षी प्रिया आणि रिंकू लग्न करतील तोपर्यंत लग्नाची तयारी थांबवण्यात आली असल्याचे पुढे आले. 

कोण आहे प्रिया सरोज?

२५ वर्षीय प्रिया सरोज या उत्तर प्रदेशातील मछलीसहर मतदारसंघातून समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत. भाजपाच्या बीपी सरोज यांचा त्यांनी पराभव केला. ३५ हजार मताधिक्यांनी प्रिया सरोज या मतदारसंघात निवडून आल्या. रिंकू आणि प्रिया सरोज हे ३ वर्षाहून अधिक काळ एकमेकांना ओळखत होते. या दोघांची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या वडिलांनी करून दिली. रिंकू सिंह क्रिकेटमध्ये तर प्रिया सरोज राजकारणात लोकप्रिय आहेत. त्या दोघांच्या लग्नासाठी अनेक चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते. 

टॅग्स :रिंकू सिंगलग्न