Join us

"वर्ल्डकप जय शाहांनी जिंकला, विराट-रोहित तर..."; माजी क्रिकेटपटूची सडकून टीका

Kirti Azad : मुंबईत चॅम्पियन भारतीय संघाच्या व्हिक्ट्री परेडनंतर वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 16:19 IST

Open in App

Team India Victory Parade : टी-२० विश्वचषक २०२४ चा चॅम्पियन बनल्यानंतर भारतीय संघ गुरुवारी ट्रॉफीसह मायदेशी पोहोचला. दिल्लीत पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्यानंतर भारतीय संघ मुंबईत परतला. मुंबईत व्हिक्ट्री परेड काढल्यानंतर वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी बीबीसीआयचे अधिकारी देखील उपस्थित होते. मात्र आता एका माजी क्रिकेटपटूने संताप व्यक्त करत बीसीसीआयचे सचिव जय शाह तसेच संस्थेचे अधिकारी असलेल्या राजीव शुक्ला यांच्यावर सडकून टीका केली आहे.

माजी क्रिकेटपटू खासदार कीर्ती आझाद यांनी बीसीसीआय सचिव जय शाह आणि बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांची  टी-२० विश्वचषक विजेत्या संघासोबत सत्कार समारंभात उपस्थित राहिल्याबद्दल खिल्ली उडवली. पश्चिम बंगालच्या बर्धमान दुर्गापूर येथून चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनी वानखेडेवरील गुरुवारच्या सोहळ्यातील फोटो शेअर करत टीकास्त्र सोडले.

तृणमूल काँग्रेसचे खासदार असलेल्या कीर्ती आझाद यांनी संघासह उपस्थित असलेल्या बीबीसीआयच्या अधिकाऱ्यांवर टीका करण्यासाठी लज्जाहीन संधीसाधू असे शब्द वापरले. कीर्ती आझाद यांनी एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट करत जय शाह आणि राजीव शुक्ला यांच्यावर बोचरी टीका केली आहे. आझाद यांनी केलेल्या या टीकेची आता सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.

"खरं तर वर्ल्ड कप अमित शाहांचे पुत्र जय शाह आणि राजीव शुक्ल यांनी जिंकला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि भारतीय संघ हा केवळ सहाय्यक होते. जगभरात कुठेही सत्कार समारंभादरम्यान अधिकारी संघाबरोबर बसत नाहीत. निर्ल्लज संधीसाधू लोक," असे कीर्ती आझाद यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टमध्ये आझाद यांनी दोन फोटोही शेअर केले आहेत ज्यामध्ये जय शाह आणि राजीव शुक्ल हे खेळाडूंसोबत पहिल्या रांगेत बसल्याचं दिसत आहे.

दरम्यान, विश्वचषक जिंकून आयसीसी ट्रॉफी जिंकणारा भारतीय संघ बार्बाडोसमध्ये चक्रीवादळामुळे उशीराने गुरुवारी नवी दिल्लीत दाखल झाला.विमानतळावर जल्लोषात स्वागत केल्यानंतर खेळाडू केक कटिंग समारंभासाठी दिल्लीतील हॉटेलमध्ये गेले. त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेटायला गेले. त्यानंतर संघ मुंबईला रवाना झाला. मुंबईत खुल्या बसमधून व्हिक्ट्री परेडमध्ये सहभागी झाले. त्यांच्या दिवसाची सांगता वानखेडे स्टेडियमवर सत्कार समारंभाने झाली. 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतीय क्रिकेट संघजय शाहविराट कोहली