Join us  

मालिका विजयाने दिली अडथळ्यांवर मात करण्याची प्रेरणा

 ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरी पराभूत करणे ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. सहापेक्षा अधिक अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत, पहिल्या सामन्यात ३६ धावांवर बाद झाल्याची नामुष्की सोबत बाळगून भारतीय खेळाडूंनी दाखवलेला विजयी ‘दम’ क्रिकेटमध्ये वर्षानुवर्षे स्मरणात राहील.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 4:26 AM

Open in App

व्हीव्हीएस लक्ष्मण -माझ्या शरीरात रक्तप्रवाह सारखा धावत आहे. गाबामध्ये  भारताने सनसनाटी विजय मिळविल्यापासून उत्साहाची पातळी कायम आहे. अखेरचे तिन्ही कसोटी सामने  प्रेरणास्पद ठरले यात शंका नाही. कसोटी क्रिकेट खूप आनंददायक आहे. गेल्या दीड दिवसात दोन्ही मुले सर्वजित आणि अचिंत्या यांना मी वारंवार सांगितले की, सध्याच्या भारतीय संघाने आयुष्यात वाटचालीचे धडे दिले. कठीण समयी कशी वाटचाल करायची आणि सर्व अडथळ्यांवर मात करीत विजयी पताका उंचवायची, ही प्रेरणा या विजयापासून लाभली. ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरी पराभूत करणे ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. सहापेक्षा अधिक अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत, पहिल्या सामन्यात ३६ धावांवर बाद झाल्याची नामुष्की सोबत बाळगून भारतीय खेळाडूंनी दाखवलेला विजयी ‘दम’ क्रिकेटमध्ये वर्षानुवर्षे स्मरणात राहील. ॲडिलेडच्या पराभवापासून बोध घेत खेळाडूंनी दाखवलेले धैर्य, संयम आणि निर्धार याचे साक्षीदार असलेल्या आम्हा सर्वांसाठी ही कामगिरी अभिमानास्पद आहे. ॲडिलेडनंतर एखाद्या स्प्रिंगबोर्डप्रमाणे भारतीय संघाने स्वत:ला सज्ज केले. कोच रवी शास्त्री यांनी या खेळाडूंना, तुमचे भविष्य तुमच्या हातात आहे, हा कानमंत्र दिला. त्यातून बोध घेणाऱ्या प्रत्येकाने देशासाठी खेळण्याचा निर्धार केला. आपल्याला काय करायचे आहे हे ओळखून खेळ केला. प्रत्येकाने  क्षमतेने योगदान दिले. एमसीजीच्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या सत्रात याची साक्ष पटली. ॲडिलेडचा दारुण पराभव आम्ही मागे सोडला. ‘आम्हाला सहज घेऊ नका,’ असा स्पष्ट संदेश यजमानांना देण्यात आला होता.  भारताचा हा संघ ‘वन मॅन आर्मी’ नाही. या संघात अनेक ‘हिरो’ आहेत. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा, आर. अश्विन यांच्यापासून ऋषभ पंत, शुभमन गिल, हनुमा विहारी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आणि टी. नटराजन या सर्वांच्या योगदानातून ऐतिहासिक कामगिरी घडली. संघ व्यवस्थापन, कर्णधार आणि खेळाडू यांच्यात निर्णय घेताना एकवाक्यता जाणवली. घेतलेले निर्णय संघाच्या हितावह कसे आहेत, हे खेळाडूंना पटवून देण्यात आले होते. त्यामुळेच कुलदीपऐवजी वॉशिंग्टनला संधी मिळाली आणि मयांकला सलामीऐवजी मधल्या फळीत पाठवण्यात आले होते.  (गेमप्लेन)गाबा मैदानावर पहिल्या डावात वॉशिंग्टन-शार्दुल यांच्यात झालेली भागीदारी हा ‘गेम चेंजिंग’क्षण होता. कठीण खेळपट्टीवर तीन वेगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूविरुद्ध दडपणात धावा काढणे सोपे नव्हते. टी-२० त खेळणाऱ्या सध्याच्या पिढीकडून इतकी संयमी कामगिरी व्हावी, हा देखील एक मोठा धडा आहे. प्रत्येक खेळाडूच्या वाटचालीत हा अनुभव बोधप्रद ठरावा.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअजिंक्य रहाणेभारतआॅस्ट्रेलिया