Most runs for India in T20I cricket : भारतीय महिला क्रिकेट संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर निर्भेळ यश मिळवण्याच्या तयारीत आहे. तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत भारतीय संघाने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आज सुरू असलेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने २० षटकांत ५ बाद १३८ धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यात सलामीवीर स्मृती मानधना ( Smriti Mandhana ) हिने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २०००+ धावा करणारी ती भारताची तिसरी महिला फलंदाज ठरली आहे, तर एकूण पाचवी भारतीय खेळाडू ठरली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्मृतीने भारतीय पुरुष संघाचे स्टार फलंदाज लोकेश राहुल, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी यांनाही मागे टाकले आहे.
प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला पहिल्याच षटकात शेफाली वर्माच्या ( ५) रुपाने झटका बसला. स्मृती व सभिनेमी मेघना यांनी डाव सावरला. स्मृतीने २१ चेंडूंत ३ चौकारांसह २२ धावा करताना ट्वेंटी-२०तील २००० धावांचा टप्पा ओलांडला. मेघनाने ( २२), हरमनप्रीतने नाबाद ३९ आणि जेमिमा रॉड्रीग्जने ३३ धावांची खेळी केली. ट्वेंटी-२०त भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये हरमनप्रीत कौर २३७२ धावांसह ( १२३ सामने) अव्वल स्थानावर आहे, तर माजी कर्णधार मिताली राज २३६४ धावांसह ( ८९ सामने) दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्मृतीने ८६ सामन्यांत २०११ धावा केल्या आहेत.
भारतीय पुरुषांमध्ये रोहित शर्मा १२५ सामन्यांत ३३१३ धावांसह अव्वल आहे, तर विराट कोहली ९७ सामन्यांत ३२९६ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीयांमध्ये हरमनप्रीत कौर, मिताली राज व स्मृती यांचा क्रमांक येतो.