भारतीय पुरुष संघासोबत महिला संघही पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी बीसीसीआयनं नुकताच संघ जाहीर केला. इंग्लंड दौऱ्यावर महिला संघ एक कसोटी, तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या संघातील काही ग्लॅमरस चेहऱ्यांबाबत जाणून घेऊया...
स्मृती मानधना ( Smriti Mandhana) - महाराष्ट्राची कन्या स्मृतीनं अल्पावधीतच संघातील स्थान मजबूत केलं. आक्रमक फलंदाजीनं तिनं भल्याभल्या स्टार गोलंदाजांची धुलाई केलीय. ५६ वन डे व ७८ ट्वेंटी-२० सामन्यांत तिनं अनुक्रमे २१७२ व १७८२ धावा केल्या आहेत. वन डेत तिच्या नावावर ४ शतकं व १८ अर्धशतकं आहेत.
मिताली राज ( Mithali Raj) - भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी नाव म्हणजे मिताली राज... २१४ वन डेत ७०९८ धावा आणि ८९ ट्वेंटी-२०त २३६४ धावा तिच्या नावावर आहेत. १० कसोटीत तिनं ६६३ धावा केल्या आहेत. कसोटीत तिच्या नावावर द्विशतकही आहे.
हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur) - भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मर्यादित षटकांच्या संघाची कर्णधार असलेली हरमनप्रीत आक्रमक खेळीने ओळखली जाते. तिनं १०४ वन डे व ११४ ट्वेंटी-२० सामन्यांत संघाचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे २५३२ व २१८६ धावा कुटल्या आहेत. वन डे क्रिकेटमधील तिची नाबाद १७१ धावांची खेळी आजही सर्वांना मंत्रमुग्ध करते.
तानिया भाटीया ( Taniya Bhatia) - यष्टिरक्षक-फलंदाज तानियानं १५ वन डे व ५० ट्वेंटी-२० सामन्यांत अनुक्रमे १२१ व १६६ धावा केल्या आहेत.
प्रिया पुनिया ( Priya Punia) - इंग्लंड दौऱ्यासाठी मनावर दगड ठेऊन ही खेळाडू भारतीय संघासोबत रवाना होणार आहे. १८ मे रोजी तिच्या आईचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ७ वन डे व ३ ट्वेंटी-२० सामन्यांचा अनुभव पाठिशी असलेल्या प्रियानं भारतीय महिला संघात स्थान पटकावण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे.